
ठाणे – ठाणेकर दिव्यांगांच्या उदरनिर्वाहासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी विविध योजना ठाणे महापालिकेला प्रशासनाला सुचविल्या आहेत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या योजनांची तातडीने अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केल्यानंतर समाज विकास विभागाच्या उपयुक्त अनघा कदम यांनी उद्याच जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आश्वासन दिल्याने दिव्यांगांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
ठाणे महापालिका महाराष्ट्रातील अशी एकमेव महापालिका आहे जी दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी पावलं उचलत असते. महापालिकेतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे, दिव्यांग नागरिकांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांचा आदर्श आज इतर तालुक्यांमध्ये आणि राज्यातील विविध महापालिकांमध्ये घेतला जात आहे.
या वर्षी दिव्यांग बांधवांना आणि त्यांच्या मुलांसाठी राबवल्या जाणाऱ्या नव्या योजनांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात थोडा विलंब झाला होता. खासदार नरेश म्हस्के हे सातत्याने याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करत होते. धर्मवीर दिव्यांग सेनेच्या माध्यमातून आज ठाणे महापालिकेच्या दिव्यांग विभागाच्या अधिकारी सौ. अनघा कदम यांची दिव्यांग बांधवांनी भेट घेतली. यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी देखील त्यांच्यासोबत फोनवर संवाद साधला.