
विभाग स्तरावर विविध गटांमध्ये ठाणे जिल्ह्याला मानाचे स्थान
ठाणे – पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांच्या जतन व संवर्धनासाठी राज्य शासनामार्फत राबविण्यात येणारे “माझी वसुंधरा अभियान” दिनांक २ ऑक्टोबर २०२० पासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू करण्यात आले. या अभियानाचा पाचवा टप्पा म्हणजेच “माझी वसुंधरा अभियान ५.०” हा दिनांक १ जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत राज्यभर राबविण्यात आला.
ठाणे जिल्ह्याने या अभियानात उल्लेखनीय कामगिरी करत विभाग स्तरावर मानाचे स्थान पटकावले आहे. विभाग स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ठाणे जिल्ह्याला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. विभाग स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारे गट विकास अधिकारी म्हणून पंचायत समिती मुरबाड, तसेच जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी करणारे गट विकास अधिकारी म्हणून पंचायत समिती भिवंडी यांची निवड करण्यात आली आहे. याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
या टप्प्यात राज्यातील ४२२ नागरी स्थानिक संस्था व २७,८९५ ग्रामपंचायती अशा एकूण २८,३१७ स्थानिक स्वराज्य संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, वृक्षारोपण, स्वच्छता उपक्रम, ऊर्जा बचत, कचरा व्यवस्थापन आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. अभियानातील कामगिरीच्या आधारे शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांचे मूल्यमापन करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था व अधिकाऱ्यांना रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.ग्रामपंचायत स्तरावर देखील ठाणे जिल्ह्याने विशेष यश संपादन केले आहे.
• १० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या गटात काल्हेर ग्रामपंचायत – राज्यात प्रथम क्रमांक – रोख रक्कम बक्षीस १.७५ कोटी (एक कोटी पंच्याहत्तर लक्ष) तसेच भुमी थीमॅटिक मधील उच्चत्तम कामगिरी करिता रोख रक्कम ७५ लाख (पंच्याहत्तर लक्ष)• १ हजारांपेक्षा कमी लोकसंख्या गटात सिंगापूर ग्रामपंचायत – राज्यात तृतीय क्रमांक – रोख रक्कम बक्षीस ५० लाख (पन्नास लाख)
तसेच विभाग स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ठाणे जिल्ह्याला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. हे यश जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे :
“माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये ठाणे जिल्ह्याला मिळालेले यश हे केवळ पुरस्कारापुरते मर्यादित नसून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांनी पंचतत्त्वांच्या जतनासाठी घेतलेली जबाबदारी आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणी यामुळेच ठाणे जिल्ह्याने राज्य पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जलसंधारण, वृक्षारोपण, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा बचत आणि हरित उपक्रम यांसारख्या विविध उपक्रमांत स्थानिक स्वराज्य संस्थांनी दाखविलेली बांधिलकी कौतुकास्पद आहे.”
“हे यश पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. पर्यावरण संवर्धन ही एकदाच राबवायची मोहीम नसून ती सातत्याने जोपासायची जीवनशैली आहे. त्यामुळे आगामी ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व संबंधित विभागांनी नव्या जोमाने पुढाकार घ्यावा, नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्यावेत आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवावा, असे आवाहन करतो. हरित, स्वच्छ व शाश्वत ठाणे घडविण्यासाठी प्रशासन व जनतेचा समन्वय हाच यशाचा खरा मंत्र ठरेल.”
000