
आमदार निरंजन डावखरे यांचा आगळा उपक्रम
ठाणे : महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रेरणेतून आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या पुढाकारातून ठाण्यातील लेक शोर (विवियाना) मॉल येथे ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीताच्या १५० वर्षपूर्ती निमित्त भव्य फ्लॅश मॉब आणि सामूहिक गायनाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या प्रभावी सादरीकरणातून देशभक्तीची ज्वाला प्रज्वलित केली. विद्यार्थ्यांच्या दमदार स्वरांनी आणि जोशपूर्ण परफॉर्मन्सने ठाण्यात देशभक्तीची लहर निर्माण झाली आणि संपूर्ण परिसर उत्साहाने भारून गेला.
या प्रसंगी बोलताना आमदार अॅड. निरंजन डावखरे म्हणाले की ‘वंदे मातरम्’ हे फक्त राष्ट्रगीत नाही, तर भारतीय अस्मिता, संस्कृती आणि स्वाभिमानाचा शिरोमणी स्तंभ आहे. १५० वर्षांचे हे ऐतिहासिक गीत ठाण्यात सामूहिक रूपात सादर होताना पाहणे हा अभिमानाचा क्षण आहे. तरुणांच्या आवाजातून उमटलेला जयघोष हीच देशाची खरी ताकद आहे. राष्ट्रभावनेची ज्योत अशीच तेजस्वी राहावी, हेच या उपक्रमाचे सार आहे.
महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही कार्यक्रमाचे कौतुक करून सांगितले की “वंदे मातरम्’च्या १५० वर्षपूर्तीचे औचित्य साधून ठाण्यात झालेला हा उपक्रम तरुणांना राष्ट्रप्रेम, शिस्त आणि संस्कृतीशी जोडणारा आहे. १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन दिलेला हा देशभक्तीचा संदेश ठाणे शहराच्या सामूहिक शक्तीचे सुंदर दर्शन घडवतो.”
१५०+ विद्यार्थ्यांच्या गायन आणि नृत्य सादरीकरणाने *‘एक भारत, श्रेष्ठ भारत’*ची भावना ठाणेकरांच्या मनात पुन्हा दृढ केली. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रेरणादायी नृत्य विशेष आकर्षण ठरले.
कार्यक्रमास रवींद्र चव्हाण, अॅड. निरंजन डावखरे, यांच्यासोबत मा. खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, भाजपा प्रदेश सरचिटणीस अॅड. माधवी नाईक, भाजपा प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की, ठाणे भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप लेले, ठाणे शहर भाजपा उपाध्यक्ष मनोहर सुगदरे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. मृणाल पेंडसे, मा. नगरसेवक मनोहर डुंबरे, नारायण पवार, मा.नगरसेविका सौ. स्नेहा आंब्रे, ठाणे शहर भाजपा सरचिटणीस राजेश मढवी, विक्रम भोईर, डॉ. समीरा भारती, ठाणे शहर भाजपा उपाध्यक्ष राम ठाकूर, रमेश आंब्रे, कोकण पदवीधर प्रकोष्ठ संयोजक सचिन मोरे,तसेच इतर पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
संपूर्ण परिसरात घुमणारा “वंदे मातरम्” चा जयघोष आणि विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स मिळून ठाण्यात एक अद्वितीय देशभक्तीची ऊर्जा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.