
* स्थानिक भूमिपुत्रांची फसवणूक
* खारीगाव ते गायमुख कोस्टलरोड खर्चात तिपटीने वाढ
ठाणे : काही वर्षे घोडबंदर रोड परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असून वाहनचालकांचा मोठा खोळंबा होतो आहे. या परिसरातील वाहतूककोंडी मोठी डोखेदुखी ठरू लागलेली असताना बाळकूम ते गायमुख असा कोस्टल रोड गेल्या १६ वर्षांपासून रखडला असल्याचे उघड झाले होते मात्र या महत्वाच्या रोडची रखडपट्टी सुरु असताना चार वर्षांपूर्वी खारीगाव ते गायमुख या नव्या कोस्टल रोडला मंजुरी देण्यात आली आहे घोडबंदर परिसरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या या प्रकल्पाचे जवळपास ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाले असल्याचा दावा पालिकेचे अधिकारी करत आहेत. विशेष म्हणजे जमिनीचे भुसंपादन करताना शासकीय नियमांना तिलांजली देण्यात येत असून रोखीने मोबदला न देता टीडीआर देण्यात येत आहे त्यातही सत्ताधारी पक्षाचे काही स्थानिक लोकप्रिनिधी मोठ्या प्रमाणात दलाली उकळत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत .
सहा वर्षांपूर्वी तत्कालीन पालक मंत्री आणि सध्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील रखडलेल्या प्रकल्पांसंदर्भात चर्चा झाली होती यात ठाणे कोस्टल रोडबाबतही सकारात्मक विचार करण्यात आला होता . ठाणे शहराच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वपूर्ण असून शहरातील वाहतुकीची कोंडी दूर होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी तत्काळ होणे गरजेचे आहे, असे सांगतानाच मुंबईच्या कोस्टल रोडच्या धर्तीवर ठाणे कोस्टल रोड विकसित करावा यासंदर्भात सर्व शक्यता तपासून पाहण्याच्या सूचना शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या . ठाणे महापालिकेने गायमुख ते खारबाव पुलाबाबत प्रकल्प अहवाल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सादर केला होता . तो संबंधित यंत्रणेने शासनाकडे तातडीने सादर करावा असे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी दिले होते .
* १६ वर्षांपूर्वीचा प्रस्ताव
ठाण्यातील वाहनांची वाढती संख्या तसेच शहरातून जात असलेल्या महामार्गावरील वाहनांची गर्दी यातून मार्ग काढण्यासाठी ठाणे खाडीकिनारालगत
जाणारा बाळकूम ते गायमुख असा बायपास प्रस्तावित करण्यात आला होता . एमएमआरडीएने १६ वर्षांपूर्वी या बायपास
रस्त्यासाठी मंजुरी दिली होती . खाडीकिनारी असलेल्या खारफुटीचे रक्षण व्हावे यासाठी काही ठिकाणी एलिव्हेटेड रस्ता ठिकाणी बांधावा असेही
सूचवण्यात आले, तसेच कोलशेत येथून रस्त्याचा काही भाग नौसेनेच्या जागेतून जात असल्याने त्याठिकाणी ३०० मीटर संरक्षक भिंतीलगत भूयारी मार्ग
बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते . दरम्यान आता या बायपास रस्त्याच्या मार्गात बदल करण्यात आला असून खारेगाव ते गायमुख या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे .
* खर्चात तिपटीने वाढ
बाळकुम – गायमुख ठाणे खाडी मेट्रो किनारा मार्गाच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे , सात वर्षांपूर्वी या प्रकल्पासाठी १३१६.१८ कोटीखर्च अपेक्षित होता मात्र चार वर्षांपूर्वी एमएमआरडीएने २६७४ कोटीच्या खर्चाला मंजुरी दिली असताना राज्याचे अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी दोन वर्षांपूर्वी जाहीर अर्थसंकल्पात ३ हजार ३६४ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या मार्गाच्या खर्चात अवघ्या काही वर्षात सुमारे तिपटीने वाढ झाली असल्याचे उघड झाले आहे .
* रोखीने मोबदला न देता भूमिपुत्रांची फसवणूक
समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या बाजारभावाच्या किमतीच्या पाचपट रोखीने मोबदला देण्यात आला मात्र या महत्वाच्या रस्त्याचे काम एमएमआरडीच्या खर्चातून करण्यात येत असताना भूसंपादन मात्र महापालिकेच्या खर्चातून करण्यात येत असून पालिकेकडे पैसे नसल्याचे कारण देत जमिनीच्या मोबदल्यात फक्त सक्तीने टीडीआर देण्यात येत आहे . त्यातही सत्ताधारी पक्षाचे काही लोकप्रतिनिधी खासजी बिल्डर्सना टीडीआर विकून मोठी दलाली घेत स्थानिक भूमिपुत्रांची पिळवणूक करत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत .
.