
” डॉ. प्रशांत सिनकरांच्या निवेदनाने सरकार जागं !
मनोरुग्णालयातील झाडतोड प्रकरण : मुख्यमंत्री दालनाची तात्काळ दखल
निवेदन थेट वन विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवले
ठाणे : ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील प्रस्तावित झाडतोडीविरोधात पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी दिलेल्या निवेदनाची मुख्यमंत्री दालनाने तात्काळ दखल घेतली आहे. डॉ. सिनकर यांचे निवेदन मुख्यमंत्री सचिवालयाने संपूर्ण प्रकरण थेट वन विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवले असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे.
ठाणे शहराच्या मध्यभागी असलेला मनोरुग्णालय परिसर हे शहराचे अतिमहत्त्वाचे हरित क्षेत्र मानले जाते. शेकडो वर्षे जुन्या वृक्षांनी व्यापलेला हा पट्टा ऑक्सिजनचा नैसर्गिक स्त्रोत असून तापमान नियंत्रित ठेवण्यासही मोठी मदत करतो. परंतु कुंभमेळा, विकासकामे आणि पुनर्बांधणीच्या नावाखाली गेल्या काही काळापासून या परिसरातील झाडतोडीच्या हालचालींना वेग आला आहे. स्थानिक पर्यावरणप्रेमी, नागरिक आणि संस्थांनीही सातत्याने विरोध दर्शवला आहे.
स्थलांतरित झाडांचा मृत्यूदर अत्यंत जास्त असल्याकडे लक्ष वेधत, “जिवंत झाडे वाचवणे हीच खरी विकासाची दिशा” अशी ठाम भूमिका डॉ. प्रशांत सिनकर यांनी निवेदनातून मांडली. स्थलांतरानंतर झाडे फार काळ जिवंत राहत नाहीत, मुळे तुटतात, माती बदलल्याने झाड कोसळते किंवा काही महिन्यांत वाळते या वस्तुस्थितीवर त्यांनी विशेष भर दिला.
मुख्यमंत्री दालनाकडून निवेदनास मिळालेली तातडीची दखल हे या पर्यावरणविषयक मुद्द्याचे गांभीर्य अधोरेखित करते. प्रशासकीय पातळीवर या मुद्द्याकडे गंभीरपणे पाहिले जात असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रकरण आता वन विभागाकडे गेल्यामुळे पुढील निर्णयाला वेग येण्याची आणि प्रत्यक्ष स्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.
या परिसरातील झाडे केवळ हिरवळ नाहीत, तर जैवविविधतेचे घर आहे. अनेक दुर्मीळ पक्ष्यांचे निवासस्थान, थंडावा निर्माण करणारी नैसर्गिक छाया, पावसाचे पाणी जमिनीत मुरवणारी मुळे आणि प्रदूषण शोषणारी पाने या सर्व गोष्टी या झाडांमुळेच शक्य झाल्या आहेत. म्हणूनच, झाडतोड झाली तर ठाणे शहराच्या पर्यावरणीय संतुलनावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते.
*
“झाडांची कापणी म्हणजे फक्त लाकूड कमी होणे नाही… ती आपल्या शहराच्या श्वासाची दोरी कापण्यासारखी आहे. प्रत्येक पडणारं झाड म्हणजे ठाण्याच्या भविष्यातून एक पान हरवणं.”
डॉ. प्रशांत सिनकर (पर्यावरण अभ्यासक ठाणे)
–