
मुख्यमंत्री कार्यालयाचे आश्वासन
ठाणे : नाशिक तपोवन परिसरातील कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित झाडतोडीविरोधात पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत रविंद्र सिनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर निवेदन सादर केले होते. या निवेदनाची मुख्यमंत्री कार्यालयाने तात्काळ दखल घेत, संबंधित प्रस्ताव वन विभागाकडे तातडीने पाठवला असून आवश्यक कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
तपोवन परिसर हा नाशिकचा फुफ्फुस मानला जातो. कुंभमेळ्याच्या तयारीत या परिसरातील शेकडो झाडांवर कुर्हाड चालविण्याचा प्रस्ताव पुढे आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली होती. डॉ. सिनकर यांनी सादर केलेल्या निवेदनात “कुंभमेळा पवित्र आहे, पण तो निसर्गाची किंमत मोजून होऊ नये” असे प्रतिपादन करत पर्यायी उपायांची यादीही सादर केली होती.
या निवेदनाची मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेतलेली दखल अत्यंत महत्त्वाची मानली जाते. वन विभागाला पाठवलेल्या सूचनांनुसार, तपोवनातील झाडांबाबतचा संपूर्ण प्रस्ताव नव्याने तपासून पर्यावरणीय दृष्टिकोनातून पुनर्विचार करण्याची प्रक्रिया आता सुरू होणार आहे.
या घडामोडीनंतर नाशिकमधील पर्यावरणप्रेमी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तपोवनातील झाडतोडीवरील निर्णय आता वन विभागाच्या पुनर्विचार प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार असून, पर्यावरण व विकास यांच्या संतुलनाला या निर्णयामुळे नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
“निसर्गाच्या रक्षणासाठी सरकार सकारात्मक पाऊल टाकत आहे याचा आनंद आहे. तपोवनचा निसर्ग वाचवण्यासाठी शासन-नागरिक-तज्ञ यांच्या संयुक्त प्रयत्नांनीच खरी दिशा मिळणार आहे.”
डॉ. प्रशांत सिनकर (पर्यावरण अभ्यासक ठाणे)