
* पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांची मागणी
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात NIMHANS धर्तीवरील आधुनिक संस्था उभारण्याच्या निर्णयाचे आम्ही सर्वांनी स्वागत केले आहे. हा प्रकल्प निश्चितच सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. परंतु या विकासकामाच्या आड येणारी शेकडो झाडे लवकरच तोडली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. ठाणे मनोरुग्णालय परिसरातील प्रस्तावित झाडतोड तात्काळ थांबवावी. अशी मागणी पर्यावरण अभ्यासक, व ज्येष्ठ पत्रकार डॉ. प्रशांत सिनकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे .
सरकारकडून “झाडांचे स्थलांतर करून दुसरीकडे लावले जाईल” अशी दिलासा देणारी भूमिका मांडली जाते. पण साहेब, प्रत्यक्षात हे कागदावरील आश्वासन आहे. स्थलांतरित केलेली झाडे फारशी जगत नाहीत, हे गेल्या अनेक वर्षांत ठाण्यात व राज्यातील अनुभवाने सिद्ध झाले आहे.कटू वास्तव असे आहे की, स्थलांतरित झाडे मरतात. झाडे उखडताना त्यांची सूक्ष्म मुळे तुटतात. माती, पाणी, वातावरण अचानक बदलते. झाड घाबरतात आणि त्याची वाढ थांबते आणि काही महिन्यांत झाड कोमेजून मरते, ठाण्यातील मनोरुग्णालय परिसरातील उदाहरणे अजूनही सर्वांच्या डोळ्यासमोर आहेत. तेव्हा विकासकामांसाठी काढलेली झाडे रुग्णालयात लावली गेली, पण काहीच महिन्यांत अनेक झाडे मृत पडलेली दिसली. हजारो रुपये स्थलांतरावर खर्च… आणि शेवटी झाडांचा मृत्यू हा पर्यावरणावरचा क्रूर अन्याय आहे. मनोरुग्णालयाचा परिसर हा ठाण्याचा हरित फुप्फुस आहे. येथे असलेली शेकडो वर्षांची झाडे शहराला शुद्ध हवा देतात, ओलावा राखतात, पक्ष्यांचा आश्रय आहेत. या झाडांचा जीवनप्रवाह एकदा खंडित झाला तर ते परत जिवंत होण्याची शक्यता अत्यल्प असते. यामुळे जिवंत झाडे वाचवण्यापेक्षा ‘स्थलांतर’ हा मार्ग पूर्णपणे अपुरा आणि अपयशी ठरतो.
त्यामुळॆ ठाणे मनोरुग्णालय परिसरातील प्रस्तावित झाडतोड तात्काळ थांबवावी, विकासकामाचे पुनर्नियोजन करून झाडांना बळी न जाऊ देता आधुनिकीकरणाचा मार्ग शोधावा , आवश्यकच असल्यास स्वतंत्र वैज्ञानिक समितीकडून झाडांच्या स्थलांतराच्या जिवंत राहण्याच्या शक्यतेचे मूल्यमापन करूनच कोणताही निर्णय घ्यावा, झाडतोडीपूर्वी नागरिक, पर्यावरण अभ्यासक आणि स्थानिक संस्थांचा सहभाग अनिवार्य करावा.
विकास आणि पर्यावरण हे एकाच हातात हात घालून पुढे जाऊ शकतात. शर्थ एवढी की “जिवंत झाडे” हेच आपल्या शहराचे सर्वात मोठे भांडवल आहे, हे आपण विसरू नये. ठाण्याची हिरवाई वाचवण्यासाठी आपल्याकडून तातडीचा सकारात्मक निर्णय मिळावा अशी मागणी पर्यावरण अभ्यासक, व ज्येष्ठ पत्रकार डॉ. प्रशांत सिनकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे .