
ठाणे – प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी ठामपा आयुक्त आणि वागळे इस्टेट पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले आहे.
ठाणे महानगर पालिका हद्दीत असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयाचे विस्तारीकरण करून नवीन इमारत बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच, आरोग्य खात्याच्या मालकीच्या याच जागेवरच विस्तारीत रेल्वे स्टेशनचेही बांधकाम करण्यात येणार आहे. या भूखंडावर साधारणपणे 1 हजार 614 वृक्ष आहेत. मात्र, बांधकामांना अडथळा ठरत असल्याने सुमारे 724 झाडे तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याने ठाणे महानगर पालिकेला पाठविला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळण्याआधीच अनेक झाडे तोडण्यात आल्याचे मनोज प्रधान यांनी केलेल्या पाहणीमध्ये उघडकीस आले आहे. या संदर्भात त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याच अनुषंगाने मनोज प्रधान, महिला अध्यक्ष सुजाता ताई घाग , युवक जिल्हा कार्याध्यक्ष राजेश कदम , जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, विक्रांत घाग, संजीव दत्ता, जगत सिंग, जतिन कोठारे, मकसूद खान, धर्मेंद्र अस्थाना , मेहरबानो पटेल, इकबाल शेख, सचिन पंधारे , प्रविण कडलक, फिरोज पठाण , तुळशीराम साळवे, रोहित गायकवाड , आदींनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांना भेटून गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिले.
प्रधान यांनी दिलेल्या निवेदनात, वृक्षतोडीबाबत दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी ठाणे महानगर पालिकेकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर हरकती सादर झाल्यानंतर वृक्षतोडीची कार्यवाही करणे गरजेचे होते. मात्र, ठामपाच्या वृक्षप्राधिकरणाने परवानगी देण्याच्या आधीच या भागातील शेकडो वृक्षांची कत्तल करण्यात आली असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील झाडे तोडताना महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ या कायद्याचा भंग झाला आहे. तसेच, या परिसरात घार, पोपट, साळुंखी आदी पशूपक्ष्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ आणि भारतीय वन कायदा, १९२७ हा कायद्याचाही भंग झाला आहे.
या तिन्ही कायद्यांचा भंग तथा अवमान करून सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृक्ष कत्तल केली असून ठाणे महानगर पालिकेच्या संबधित अधिकाऱ्यांनीही या वृक्ष कत्तलीस प्रोत्साहन दिले असल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, असे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी सांगितले.