
ठाणे : “स्पेशल चाईल्ड काही करू शकत नाही” हा समाजातील गैरसमज मोडून काढत ठाण्याच्या मयुरेश कोटियन राज्यस्तरीय पॅराऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. पुणे आणि कोल्हापूर येथे झालेल्या या स्पर्धेत १०० मीटर रिंगिंग आणि लॉंगजंप या दोन्ही प्रकारात त्याने सुवर्णपदक पटकावून थक्क करणारी कामगिरी नोंदवली.
वाघबीळ येथे राहणारा २५ वर्षीय मयुरेश कोटियन लहानपणापासून धावण्याच्या शर्यतीत पहिला यायचा . श्री माँ स्नेहदीप शाळेच्या स्पेशल चाईल्ड वर्गात त्याचे शालेय शिक्षण झाले. “मुलगा स्पेशल चाईल्ड आहे म्हणजे भविष्य अंधारात” असा विचार न करणाऱ्या कोटियन कुटुंबाने त्याच्या प्रत्येक क्षमतेला प्रोत्साहन दिले. पुढील शिक्षणासाठी मयुरेशला NASEOH (National Society for Equal Opportunity for the Handicapped) या संस्थेत दाखल करण्यात आले, जिथे तांत्रिक शिक्षणाबरोबरच धावण्याचा सराव सुरूच राहिला. याच काळात विविध छोट्या-मोठ्या ऍथलेटिक्स स्पर्धांमध्येही त्याने उत्कृष्ट यश मिळवले.
दरम्यान, पॅराऑलिंपिक स्पर्धेबाबत माहिती मिळाल्यानंतर मयुरेशच्या कारकिर्दीला नवे वळण मिळाले. व्यावसायिक पातळीवर सराव सुरू केला. नुकतेच कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या राज्यस्तरीय पॅराऑलिंपिक चॅम्पियनशिपमध्ये मयुरेशने १०० मीटर रिंगिंग आणि लॉंगजंप या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची दुहेरी कमान साधली. मयुरेशच्या या शानदार यशामागे नोशिओ इन्स्टिट्यूटचे कार्यकारी सचिव व महासंचालक योगेंद्र शेट्टी, शिक्षक राजेंद्र जगताप आणि प्रशिक्षक दत्ता चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन, मेहनत व पाठबळ आहे.