
ठाण्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला देणार भेट
ठाणे : धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षण अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण आणि आक्रमक पद्धतीने राज्यभर लढा देणारे धनगर समाजाचे लढवय्ये आणि आरक्षण चळवळीचे पुरस्कर्ते दीपकभाऊ बोऱ्हाडे हे ठाणे दौऱ्यावर येत असून समाजाच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी आणि एस.टी. आरक्षणाला वेग देण्यासाठी विविध भागातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत आंदोलनाची दिशा अधिक प्रभावी करण्याचा या दौर्याचा प्रमुख उद्देश आहे. बोऱ्हाडे यांनी समाजाच्या हक्कांसाठीचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात असल्याचे सांगत, आरक्षण मिळेपर्यंत लढा न थांबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
दीपकभाऊ बोऱ्हाडे रविवार ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास भेट देऊन समाजातील कार्यकर्त्यांशी संवाद साधाणार आहे. तरी समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले आहे.
धनगर समाजाच्या एस.टी. आरक्षण विषयक न्यायालयीन प्रक्रिया, सरकारी घडामोडी आणि पुढील आंदोलनाची दिशा या संदर्भात या सर्व बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा अपेक्षित आहे. “आरक्षण हा आमचा हक्क आहे आणि तो मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील,” असा ठाम संदेश दीपकभाऊ बोऱ्हाडे या संपूर्ण दौऱ्यातून देत असून, समाजातील मोठ्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.