स्मार्ट सिटी योजनेतील विस्तारित रेल्वे स्थानक,पूर्वेकडील सॅटिस आदी महत्वाची कामे रखडली ठाणे : प्रतिनिधी ठाण्यातील स्मार्ट सिटी योजनेतील बहुतांशी प्रकल्पाची कामे संथ गतीने सुरु असल्याचे आरोप सुरवातीपासून होत असताना सर्व कामे जुलै २०२३ अखेर काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते . महत्वाच्या प्रकल्पांपैकी , गावदेवी भूमिगत पार्किंग , पाणी पुरवठा व्यवस्थेत सुधारणा , खारेगाव खाडी किनारा विकसित करणे , नागला बंदर, साकेत येथे वॉटर फ्रंट डेव्हलप करणे यातील बहुतांशी प्रकल्पाची कामे पूर्ण झाली आहेत तर काही अंतिम टप्प्यात असली तरी शहराच्या वाहतुकीच्या नियोजनाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल असा विस्तारित रेल्वे स्थानक आणि पूर्वेकडील सॅटीस आदी महत्वाची कामे संथ गतीने सुरु आहेत . स्मार्ट सिटी योजनेतून केंद्र सरकार पाच वर्षात अवघे २५० कोटी रुपये देणार आहे. महापालिकेला स्वताचे २५० कोटी आणि राज्यसरकारचे ५०० कोटी असे एकूण किमान १ हजार कोटी मिळण्याची शक्यता असताना तब्बल ६ हजार ६३० कोटी रुपयांचा आरखडा तयार करण्यात आला होता आणि क्लस्टर योजनेत बिल्डर्सनी ३ हजार ९७४ कोटी रूपये गुंतवणूक करतील असे गृहीत धरण्यात आले होते . तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्मार्ट सिटी योजनेच्या आराखडयामध्ये समुह विकास प्रकल्प, कोपरी ते कळवा वॉटरफ्रंट विकास , ठाणे पूर्वेला सॅटीस-२ वर बहुस्तरीय विकास योजना , तीन हात नाका वाहतुक सुधारणा प्रकल्प, प्रस्तावित विस्तारित नवीन रेल्वे स्टेशन, रेल्वे स्टेशन अनुषंगिक काम , दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह नुतनीकरण , बहुमजली पार्किंग, नाला प्रकल्प, मलनि:सारण प्रकल्प, गांवदेवी भूमिगत पार्किंग योजना मासुंदा व हरियाली तलाव संवर्धन व सुशोभिकरण, शहरात विविध ठिकाणी सासीटीव्ही कॅमेरे बसविणे आदी कामे करण्याचे नियोजन करण्यात आले होते . विशेष म्हणजे यातील ठाणे पूर्व सॅटिस , विस्तारित रेल्वे स्टेशन, पाण्याचे मीटर , सीसीटीव्ही , एलईडी लाईट , पार्किंग प्लाझा हे प्रकल्प जुनेच आहेत मात्र त्यांना स्मार्ट सिटी योजनेत बसवून नवा मुलामा देण्यात आला आहे. यातील ठाणे पूर्व सॅटिसच्या कामाचे नियोजन पूर्णपणे रेल्वेवर अवलंबुन असल्याने कामही संथ गतीने सुरु आहे तर विस्तारित रेल्वे स्टेशनची जमीन हस्तांतरित करण्यास बराच विलंब झाला .त्यामुळे हे काम बरेच उशिरा सुरु झाले दुसरीकडे ठाणे पालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत “वॉटर फ़्रंट डेव्हलपमेंट ” च्या माध्यमातून खाडी किनारा सुशोभीकरणाच्या काम करण्यात आले आहे नागलाबंदर , कावेसार , वाघबीळ आणि कोलशेत , बाळकूम कळवा शास्त्रीनगर आणि कोपरी ठाणे पूर्व या प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे . स्मार्ट सिटी योजनेतून नागला बंदर वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट साठी ४५ कोटी ८२ लाख खर्च करण्यात आले आहेत, कावेसर वाघबीळ कोलशेत या पॅकेज २ प्रकल्पासाठी ५० कोटी ५३ लाख खर्च करण्यात आले असून साकेत, बाळकूम ,कळवा , शास्त्रीनगर , कोपरी या प्रकल्पासाठी ४२ किती ८४ लाख खर्च करण्यात आले आहे .
विस्तारित रेल्वे स्थानकाचे काम खूप विलंबाने ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान मनोरुग्णालयाच्या जागेवर विस्तारित ठाणे स्थानक उभारण्याचा निर्णय झाला . मनोरुग्णालयाची जागा नवीन ठाणे स्थानकासाठी देण्यास राज्य मंत्रिमंडळाने आठ वर्षांपूर्वीच मंजुरी दिली आहे. या कामासाठी महापालिकेने निविदाही मागवल्या , ठेकेदाराची नियुक्ती झाली , . स्मार्ट सिटी योजनेतून २९० कोटी खर्चापैकी २६० कोटी खर्च केला जाणार आहे तर ३० कोटी रुपये महापालिकेकडून खर्च केला जाणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली असतानाही न्यायालयात दावा सुरु असल्याने जागा अद्याप महापालिकेकडे हस्तांतरित होण्यास बराच विलंब झाला आता काम सुरु आहे मात्र संथगती मात्र कायम आहे