
महापालिकेचे दुर्लक्ष राजन विचारे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
ठाणे – भाईंदरपाडा येथील सर्वधर्मीय स्मशानभूमी ‘हरवली’ आहे. दहा वर्षांपासून ही स्मशानभूमी बांधण्यासाठी ठाणे महापालिकेने हालचाली सुरू केल्या, पण अद्याप त्याचे कामही सुरू झालेले नाही. त्यामुळे घोडबंदर भागात राहणार्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असून त्यांना अंत्यसंस्कारासाठी दूरवर जावे लागत आहे. महापालिका प्रशासनाने या स्मशानभूमीची एक वीटही अद्याप रचलेली नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये महापालिका प्रशासनाविरुद्ध असंतोष निर्माण झाला असून लवकरात लवकर त्याचे काम सुरू करावे, अन्यथा मोठे आंदोलन उभारू असा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व खासदार राजन विचारे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री. सौरभ राव यांना पत्रही पाठवले आहे.
ठाण्याच्या घोडबंदर भागाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून तेथे सर्वधर्मीयांसाठी मोठ्या स्मशानभूमीची गरज आहे. याचा विचार करूनच महापालिकेने हिंदूंसह दाऊदी बोहरा, ख्रिश्चन, ज्यू तसेच लिंगायत समाजासाठी संयुक्त स्मशानभूमी बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय २०१६ मध्ये महापालिकने घेतला. त्यास राज्य सरकारने हि जमीन हरित विभागाकडून वगळून संयुक्त स्मशानभूमी, स्मृती उद्यान व रहिवाश्यांना रस्त्यासाठी बदल करून परवानगी दिली. २०१९ साली तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्मशानभूमीचे भूमिपूजन झाले. पण अद्यापी त्याचे बांधकाम सुरु झालेले नाही. त्यामुळे नागरिकांची अंत्यसंस्कारासाठी फरफट सुरूच आहे. भाईंदरपाडा येथील २५ हजार चौरस मिटर जागेवर ही सर्वधर्मिय स्मशानभूमी बांधण्यात येणार होती. त्या शिवाय त्या परिसरात बगिचा, पार्किंग अशा सुविधा देखील देण्यात येणार होत्या. पण या सर्व गोष्टी अद्यापी कागदावरच आहेत.
भाईंदरपाड्यातील समशानभूमीमुळे हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, लिंगायत अशा अनेक धर्मियांची मोठी अडचण दूर होणार होती. २०२१ मध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी यांची “बालाजी एंटरप्रायझेस” या कंपनीने स्मशानभूमीच्या विकासाचे काम हाती घेतले होते. परंतु ते काम न करता महापालिकेचा ३५ करोडचा टीडीआर वापरून ही स्मशानभूमी बांधून देतो असे त्यांनी महानगरपालिकेला प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले होते. परंतु स्मशानभूमी विकसीत करण्याऐवजी स्वतःच्याच इमारतीचा विकास करीत इमारतीचे काम सुरु केले. या प्रकरणी ख्रिश्चन समाजाचे मेलविन फर्नांडिस यांनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेऊन ठाणे महापालिकेच्या विरोधात याचिका दाखल केली.
कोर्टाचे आदेश धाब्यावर
न्यायालयाने सर्वधर्मिय स्मशानभूमीची गरज लक्षात घेऊन ठाणे महापालिकेला तीन आठवड्याच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करून सत्या स्थिती सांगावी असे आदेश २५ नोव्हेंबर रोजी दिले. पण प्रशासनाने आजतागायत हे प्रतिज्ञापत्र सादर केले नसून कोर्टाचे आदेश धाब्यावर बसवले आहेत.
विकास कोणासाठी करायचा आहे.ठाण्याच्या घोडबंदर भागात हिंदू, ख्रिश्चन, ज्यू, मुस्लीम, लिंगायत अशा विविध धर्मियांचे व समाजाचे लोक राहतात. तिथे मोठमोठे टॉवर्स उभारले जात आहेत. वीज, पाणी, रस्ते, वाहतूक या सुविधांबरोबरच स्मशानभूमी ही देखील महत्वाची गरज आहे. त्याकडेच महापालिका दुर्लक्ष करीत असेल तर नेमका विकास कोणसाठी महापालिकेला करायचा आहे असा संतप्त सवाल शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे. त्वरीत स्मशानभूमीचे काम सुरू करा नाही तर पालिकेच्या भोगळ कारभाराविरोधात आंदोलन करण्याचा इशारा विचारे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राद्धारे म्हंटले आहे.