
- नागरिकांनी काळजी घ्यावी : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांचे आवाहन
ठाणे : ठाणे जिल्ह्यात हिवाळा सुरू होताच सर्दी, खोकला, ताप, अॅलर्जी तसेच त्वचारोगांच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाणे जिल्हा सिव्हिल रुग्णालयासह विविध शासकीय रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभागात (OPD) दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. थंड हवा, सकाळचे धुके आणि वाढते वायुप्रदूषण याचा नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याने आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शाहापूर, मुरबाड तसेच पालघर सीमेलगतच्या भागांत सकाळी धुके आणि रात्री गारवा अधिक जाणवत आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दमा, सायनस, रक्तदाब व इतर दीर्घ आजार असलेल्या रुग्णांवर होत आहे. सिव्हिल रुग्णालयात सर्दी-खोकला, घसा दुखणे, ताप, नाक वाहणे, डोकेदुखी, त्वचा कोरडी पडणे अशा तक्रारी घेऊन रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. काही रुग्णांमध्ये श्वसनाचा त्रास, छातीत जडपणा व अॅलर्जीची लक्षणेही आढळून येत आहेत.
हिवाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर स्वाइन फ्लू, डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनिया यांसारख्या आजारांबाबत नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागांत रात्रीचा गारवा अधिक असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी रक्तदाब व सांधेदुखीबाबत काळजी घ्यावी, तर लहान मुलांना उबदार कपडे घालावेत, असा सल्लाही देण्यात आला आहे.
*
ताप, श्वसनाचा त्रास, सतत खोकला किंवा आजाराची लक्षणे वाढत असल्यास स्वतः औषधे न घेता तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, पुरेसे पाणी पिणे, गरम व पौष्टिक आहार घेणे, सकाळी धुके असताना मास्कचा वापर करणे, थेट थंड वाऱ्याचा संपर्क टाळणे आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.”
डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे)