
* प्रमिला केणी , मंदार केणी यांच्या संकल्पनेतुन संगीत प्रेमींना पर्वणी
ठाणे – ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून विविध थीमवर आधारित उद्याने उभारण्यात आली आहेत . परंतु कळवा परिसरात मात्र माजी नगरसेविका प्रमिला केणी आणि त्यांचे पुत्र युवा उद्योजक मंदार केणी यांच्या संकल्पनेतून संगीत प्रेमींसाठी आगळे वेगळे संगीत उद्यान उभारण्यात आले आहे. या माध्यमातून ठाण्यातील किंबहुना कळवा , खारेगाव , विटावा परिसरातील संगीत प्रेमींसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे . नाव कलाकारांना येथे सराव देखील करता येणार आहे. या उद्यानाचे लोकार्पण रविवारी काही संगीत प्रेमीच्या हस्ते करण्यात आले .
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून विविध थीमवर आधारित उद्याने उभारण्यात येत आहेत. त्यातील काही उद्याने दुर्लक्षितपणामुळे नामशेष पावली तर, काही उद्याने मात्र आजही सुस्थितीत आहेत. दरम्यान, कळवा परिसरात आता अशाचप्रकारे संगीत प्रेमींसाठी अनोखे उद्यान उभारण्यात आले आहे. याठिकाणी ठाण्यातील संगीत प्रेमींना , कलाकारांना आपली कला सादर – करण्याबरोबरच सराव करता येणार आहे.कळवा नाक्यावर साकरण्यात आलेल्या या अनोख्या उद्यानाचे लोकार्पण रविवारी करण्यात आले. कळव्यात अनेक कलाकार आहेत. परंतु त्यांना सराव किंवा आपल्या कला सादर करण्यासाठी हक्काचे असे व्यासपीठ उपलब्ध नव्हते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन संगीतप्रेमीसाठी उद्यान उभारण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कळव्यातील शिंदे सेनेच्या माजी नगरसेविका प्रमिला केणी आणि त्यांचे पुत्र मंदार केणी यांच्या संकल्पनेतून हे उद्यान साकारण्यात आले आहे.या उद्यानात गायकांना आपली कला सादर करता येणार आहे.
याशिवाय संगीत प्रेमींना देखील आपल्या कला गुणांना वाव देता येणार आहे. याठिकाणी सरावाची देखील संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याठिकाणी आर्ट गॅलरी, प्रदर्शन, स्टँडअप कॉमेडी, डान्स सराव, अॅक्टींग, पथनाट्य सराव आदींसह इतर कार्यक्रमांसाठी देखील एक उत्तम व्यासपीठ याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.कलाकार आणि संगीत प्रेमींसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. संगीतप्रेमी येथे येऊन सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सराव किंवा आपली कला सादर करु शकणार आहेत. तसेच नागरीकांना व्यायामासाठी देखील साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. दोन ठिकाणी अॅम्पी थिएटर आणि योगासाठी देखील उपलब्ध करुन देण्यात आले आहे. याठिकाणी सुरक्षेची देखील विशेष काळजी घेण्यात आली आहे. दोन सुरक्षा रक्षक उपलब्ध असणार आहेत. शिवाय सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविण्यात आले आहेत.