
*१५ जानेवारीला मतदान , १६ जानेवारीला मतमोजणी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज्य निवडणूक आयोगाची सोमवारी अतिशय महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या महत्त्वाच्या टप्प्याच्या निवडणुकांची चर्चा आहे. याआधी राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली तेव्हाच स्पष्ट केलं होतं की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दोन टप्प्यात होतील. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने आधी राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींची निवडणूक घेतली. या निवडणुकीचे निकाल येत्या २१ डिसेंबरला लागणार आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत . १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार असून प्रचारासाठी अवघे ९ दिवस मिळणार आहेत .
सुप्रीम कोर्टाने याआधीच राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारी २०२६ च्या आधी निवडणुका घेण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीची घोषणा झाली आहे. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर शहरांसह एकूण २९ महत्त्वाच्या शहरांमधील महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या निवडणुका रखडल्या आहेत. पण आता या निवडणुका होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
मुंबई महापालिका वगळता इतर ठिकाणी ३ ते ५ उमेदवारांना मतदान करावं लागणार
“मुंबई महापालिकेत प्रभागात एक सदस्यीय प्रभाग आहे. मुंबई महापालिकेसाठी प्रत्येक मतदाराला केवळ १ मत द्यावं लागेल. तर २८ महापालिका या बहु सदस्यीय आहेत. बहुतांश महापालिकेत एका प्रभागात ४ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्या महापालिकेत काही प्रभाग असेल आहेत की, जिथे ३ उमेदवार असतील तर काही प्रभागात ५ उमेदवार असतील. त्यामुळे या २८ महापालिकांमध्ये मतदारांना साधारणपणे ३ ते ५ मते द्यावे लागतील
१५ जानेवारीला मतदान , १६ जानेवारीला मतमोजणी
२९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी नामनिर्देश पत्र स्वीकारण्याचा कालावधी हा २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ असणार आहे. या नामनिर्देशन पत्राची छाननी ३१ डिसेंबर 2025 ला होणार आहे. उमेदवारी माघारीची मुदत ही२ जानेवारी २०२६ अशी असणार आहे. तर निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी ३ जानेवारी २०२६ ला होईल. या महापालिकांसाठी मतदान १५ जानेवारी होईल. तर १६ जानेवारी २०२६ ला मतमोजणी होईल”, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.