
भू-अभिलेख विभागाची ई-मोजणी ऑनलाइन सेवा सुरू
ठाणे : नागरिकांना सातबारा उतारा, मिळकत पत्रिका आणि जमीन मोजणी प्रक्रियेपासून होणारी धावपळ कमी करण्यासाठी भू-अभिलेख विभागाने ‘महाभूमी’ या पोर्टलमार्फत ई-मोजणीची अत्याधुनिक ऑनलाइन सेवा सुरू केली आहे. महाराष्ट्र महसूल मंत्र्यांच्या निर्देशानुसार ही सेवा अधिकृतरीत्या उपलब्ध करण्यात आली असून, नागरिकांना आता घरबसल्या जमीन संबंधित अनेक कागदपत्रांची पूर्तता करता येणार आहे.
‘महाभूमी’ पोर्टलवर डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा, मिळकत पत्रिका तसेच नकाशे डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. राज्य शासनाच्या नव्या धोरणानुसार ई-मोजणीसाठीची अर्ज प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात नागरिकांनी mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ‘ई-मोजणी वर्जन 2’ या पर्यायाचा वापर करून नवीन युजर खाते तयार करावे. सर्व माहिती भरल्यानंतर खाते सक्रिय करून नगर भू-अभिलेख कार्यालयाशी लिंक करणे आवश्यक आहे.
दुसऱ्या टप्प्यात खाते लिंक झाल्यानंतर हद्द कायम, बिगर शेती किंवा शेती मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. यासाठी अर्जदाराने अलीकडील तीन महिन्यांतील छायाचित्र, मिळकत पत्रिका आणि नकाशा संलग्न करणे अनिवार्य आहे. तसेच धारक व सहधारकांची पूर्ण माहिती नमूद करणे आवश्यक आहे.
ठाणे महापालिकेच्या हद्दीतील सर्व गावांचे ई-मोजणी अर्ज आता पूर्णपणे ऑनलाइन स्वीकारले जात आहेत. 1 ऑक्टोबर 2025 पासून ही सेवा सर्वांसाठी उपलब्ध असून, नागरिकांनी या सुविधेचा व्यापक प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.महापालिकेच्या विविध विभागांकडून मिळकत पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ज मंजूर करण्यात येणार आहेत.
कोणत्याही तांत्रिक अडचणी किंवा शंका असल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन भू-अभिलेख कार्यालयाने केले आहे.
केंद्रे – 7020931496 नौपाडा कोपरी, जाधव – 9167364730 पाचपखाडी, दुसाने – 8484966527, कळवा बाळकुम, पिंगळे – 9137357507 माजीवाडा व कासारवडवली, परिसर.