
ठाणे – आजच्या काळात महिलांना घर सांभाळून स्वतच्या पायावर भक्कम उभे राहता यावे, यासाठी कौशल्याधारित प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. केक बेकिंग हा असा व्यवसाय आहे जो कमी गुंतवणुकीत घरबसल्या सुरू करता येतो. याच उद्देशाने ज्योतीरत्ना फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. ज्योती रत्नाकर मढवी यांनी ठाण्यातील वाघबिळ गावात केक बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
ज्योतीरत्ना फाऊंडेशनच्या माध्यमातून सौ. ज्योती रत्नाकर मढवी या गेली अनेक वर्ष महिलांच्या उत्कर्षासाठी विविध उपक्रम राबवित असतात. ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक नारायण मढवी यांचा सामाजिक वारसा त्या निरपेक्ष भावनेने पुढे नेत आहेत. कमी खर्चात कोणता व्यवसाय करता येईल अशी मागणी महिलांकडून होत होती. त्यांच्या मागणीनुसार रविवारी ही कार्यशाळा वाघबिळ येथे संपन्न झाली. समाजसेवक रत्नाकर नारायण मढवी यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. प्रशिक्षक लक्ष्मी पाटील यांनी उपस्थित महिलांना प्रात्यक्षिकासह केक बनविण्याचे प्रशिक्षण दिले.
यावेळी प्रसिध्द आगरी परंपरा आपल्या गायनातून पुढे नेणाऱया ‘धवलरीन बाय’ अवनी पाटील या प्रमुख पाहूण्या म्हणून उपस्थित होत्या. अवनी पाटील यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सौ. ज्योती रत्नाकर मढवी यांनी उचलेले हे पाऊल हे कौतुकास्पद आहे. समाजातील महिलांनी चूल मुल न करता स्वत:च्या पायावर उभे रहावे व स्वावलंबी व्हावे. छोट्या छोट्या उपक्रमांतून आपल्या संसाराला हातभार लावावा, असा सल्ला अवनी पाटील यांनी उपस्थित महिलांना दिला.