
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व सुविधांनी युक्त् अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनीक टेभींनाका येथील सी. आर. वाडिया दवाखाना येथे सुरू करण्यात आले. या क्लिनीकचे उद्घाटन आज खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. वर्षा ससाणे, माजी नगरसेविका पूजा वाघ आदी उपस्थित होते.
सी.आर. वाडिया दवाखान्यात सुरु झालेल्या सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनीकमध्ये डेंटल चेकअप, डेंटल क्लिनींग, डेंटल फिलींग, टूथ एक्सट्रॅक्शन इत्यादी उच्च दर्जाच्या सेवा नागरिकांना मोफत उपलब्ध होणार आहे. याकरिता 2 स्पेशालिस्ट डॉक्टरांची नियुक्त् करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दंतविभागातही या सेवा देण्यात येतात. या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या असल्याने अनेकवेळा रुग्णांना खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घेणे परवडत नाही, तसेच बरेच वेळा हे उपचार मेडिकल पॉलीसीमधून नाकारण्यात येतात. रुग्णांना वेळेवर उपचारमिळावेत यासाठी सी.आर. वाडिया दवाखान्यात हे डेंटल क्लिनीक सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर पाळीव प्राण्यांची ‘Pet Care Thane’ अंतर्गत नोंदणी, मध्यवर्ती औषधी भांडारगृह येथे औषण वितरण करण्याकरिता आधुनिक तंत्रप्रणाली, जीआयसी हाऊंसीग फायनान्सच्या लिमीटेडच्या सीएसआर निधीतून प्राप्त झालेल्या सोनोग्राफी मशीन्स, तसेच काजूवाडी आरोग्य केंद्र, शिळ आरोग्य केंद्र या दोन ठिकाणी नवीन एक्स रे मशील तसेच 22 नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिराचे लोकार्पण खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले. पशु वैद्यकीय विभागामार्फत कुत्रे, मांजरी इत्यादी पाळीव प्राण्यांची नोंदणी Pet Care Thane’ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करण्यात येत आहे, यामुळे लसीकरणे, आरोग्य नोंदी आणि मालकांची माहिती डिजीटल स्वरुपात एकत्रित राखता येणार आहे. मध्यवर्ती आरोग्य औषधी भांडारगृहातून सर्व आरोग्य केंद्र, प्रसुतीगृह व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे औषधांचे नियमित व वेळेवर वितरण करण्यासाठी आधुनिक सप्लाय चेन व्यवस्थेचा अवलंब करण्यात आला, यामुळे औषधांचा तुटवडा, औषधाची कालबाह्यता मारीख आदी बाबी टाळण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे सीएसआर निधीतून प्राप्त झालेल्या सोनोग्राफी मशीन्स उपयोग आरोग्य केंद्रात होणार आहे. काजूवाडी आरोगय केंद्र, शीळ आरोग्य केंद्र या ठिकाणी बसविलेल्या एक्स रे मशीन मुळे हाडांचे, छातीचे एक्स रे आणि निदान प्रक्रिया त्वरीत व अचूकपणे करता येणार आहेत. 22 आयुष्यमान आरोग्य केंद्रामध्ये बाह्यरुगण सेवा, मोफत औषधोपचार, गर्भवती मातांची तपासणी, मानसिक आरोग्यसाठी समुपदेशन सेवा, आदी विविध सेवा उपलब्ध होणार आहेत.