
ठाणे: प्रतिनिधी
गृहनिर्माण सोसायटयांचे अभिहस्तांतरण (कनव्हेन्स) व मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कनव्हेन्स) प्रक्रिया सुलभ व्हावी, याकरीता ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनने पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्तिक बैठक येत्या शुक्रवार, दि. २८ नोव्हे. रोजी सायंकाळी ४ वाजता वसंतराव नाईक सभागृह, बी केबिन ठाणे (प) येथे आयोजित केली आहे.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष – २०२५ च्या निमित्ताने ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्यावतीने ‘सहकारातुन समृद्धी’ या संकल्पनेला अनुसरून वर्षभर विविध उपक्रम व ज्ञान प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या अनुषंगाने हौसिंग फेडरेशन मार्फत डीम्ड कनव्हेन्स व कन्व्हेयन्स संदर्भात कार्यशाळा आयोजित केली आहे. बहुतांश गृहनिर्माण सोसायटयांनी डीम्ड कनव्हेन्स किंवा कनव्हेन्स केल्यानंतर प्रॉपर्टी कार्डवर किंवा ७/१२ उताऱ्यावर नाव दाखल करण्यासंबंधीच्या विविध तक्रारी येत आहेत. या विषयी आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्तिक बैठक शुक्रवार दिनांक २८ नोव्हे. रोजी सायंकाळी ४ वाजता वसंतराव नाईक सभागृह, बी केबिन ठाणे (प) येथे आयोजित केली आहे. त्याकरिता मौजे मानपाडा, ढोकाळी, कावेसर, बाळकुम, माजीवाडा, कोलशेत, खारेगाव, कळवा, पांचपाखाडी या विभागातील ज्या गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारी आहेत त्यांनी कागदपत्रांसाहित उपस्थित राहावे.
संबंधित विभागाचे अधिकारी या समस्यांवर तात्काळ निर्णय घेणार असल्याने त्याविषयीचे सर्व कागदपत्रे सोबत आणावीत. तसेच कार्यक्रम सुरू होण्याअगोदर आपली नोंदणी कागदपत्रांसाहित कार्यक्रमाच्या ठिकाणी करावी. असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास आमदार संजय केळकर, जिल्हा उपनिबंधक डॉ. किशोर मांडे, नगर भूमापन (टी.एल.आर.) अधिकारी सिद्धेश्वर धुले, दि ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑप. हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे व वरील विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी दि ठाणे डिस्ट्रिक्ट को ऑप हाऊसिंग फेडरेशनशी पुढील ९९२०३३२२८६ /९३२३३३२२८६ नंबरवर संपर्क साधावा.