
* फक्त बेकायदा नव्हे तर अधिकृत व्यवसायिकांकडून पण सक्तीच्या प्रोटेक्शन मनीची वसुली करण्यात येत असल्याचा आरोप
ठाणे : महाराष्ट्र्र टॉक न्यूज नेटवर्क घोडबंदर परिसरातील बेकायदेशीर हुक्का बार, बार, आणि स्पा सेंटर चालवण्यात येतात ,
खासगी शेतजमीन आणि वन विभागाच्या जागेवर अनधिकृत बांधकामे उभारून बेकायदा हॉटेल, बार आणि हुक्का पार्लर खुलेआम सुरू करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. या ठिकाणी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत कर्णकर्कश आवाजामध्ये डीजे, म्युझिक सिस्टीमच्या माध्यमातून प्रचंड ध्वनिप्रदूषण केले जात असून बेकायदा पद्धतीने मद्यविक्री, हुक्का पार्लर, लाऊंज चालवले जात आहेत पोलीस मोठ्या प्रमाणात हप्तेवसुली करून त्यांना संरक्षण देत असल्याचे आरोप करण्यात येत असताना आता अधिकृत व्यवसायिकांकडून पण सक्तीच्या प्रोटेक्शन मनीची वसुली करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत असल्याने घोडबंदर परिसरातील पोलीस संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत .
धक्कादायक बाब म्हणजे येथे बांधकाम करण्यापूर्वी आवश्यक असलेले बिनशेती (एनए) आदेश, गाव नमुना नंबर, सातबारा उतारा, बांधकामासाठी महापालिकेकडून आवश्यक परवानगी, मद्यविक्री परवाना, हुक्का परवाना, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि इतर शासकीय विभागाच्या कोणत्याही परवानग्या न घेता बिनदिक्कतपणे बेकायदा व्यवसाय चालवले जात असताना पोलिसांकडून मात्र त्यांना संरक्षण देण्यात येत असल्याचे आरोप आहेत . शहरातील घोडबंदर रोड परिसरातील अनेक ठिकाणी वन व सरकारी जमिनीवर अतिक्रमणे झाली आहेत. बांधकाम परवानग्यांशिवाय बेकायदा अतिक्रमणे करून बहुतांश ठिकाणी अग्निशमन दलाचे ना- हरकत प्रमाणपत्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी नसतानाही मद्यविक्री केली जात आहे. रात्री आवाजाच्या मर्यादा मोडून प्रचंड आवाजात संगीत वाजवले जाते. त्यावर शहराच्या वेगवेगळ्या भागातून आलेले तरुण-तरुणी धिंगाणा करतात. मद्यपान, हुक्क्याच्या जोडीला अमली पदार्थांचीही बेकायदा विक्रीची केंद्रे या भागात उभी राहू लागली आहेत. सर्व बेकायदा कॅफे, ढाबे आणि बारवर कर्कश आवाजातील पार्ट्या पहाटेपर्यंत दररोजच सुरू असतात. शिवाय, त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून महामार्गावर अपघाताची शक्यता निर्माण केली जाते. घोडबंदर परिसरातील ठाणे खाडी किनाऱ्यापर्यंत या बेकायदा उद्योगांचा पसारा वाढला असल्यामुळे शहरातील तरुणपिढीमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे. त्यामुळे शहरात अपघात आणि महिलांच्या छेडछाडीचे प्रकार वाढीस लागत असल्याच्या तक्रारी स्थानिक करत आहेत. मात्र या बेकायदा धंद्यांना परिसरातील पोलीस खुलेआम संरक्षण देत आहेत असा नागरिकांचा आरोप आहे .
* युवा पिढीतील व्यसनाधीनता वाढतेय …
घोडबंदर रोड परिसरातील लाऊंज, बार, हुक्कापार्लरमध्ये तरुण पिढी मोठ्या संख्येने दाखल होत असून यामध्ये तरुणींचाही समावेश असतो. त्यामुळे मद्यपी तरुणांकडून या मुलींची छेडछाड करण्याचे प्रकारही सर्रास समोर येत असले तरी या प्रकरणी घरच्यांच्या भीतीने अनेक तरुणी तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या भागातील गस्त वाढवून असे बेकायदा प्रकार तात्काळ बंद करण्याची मागणी घोडबंदर भागातील रहिवाशांनी केली आहे.
* अधिकृत व्यवसायिकांकडून पण सक्तीची प्रोटेक्शन मनीची वसुली
घोडबंदरच्या कासारवडवली पोलीस ठाण्यात एका युवकाला पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता त्या संदर्भातील एक क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती यामुळे कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी अडचणीत आलेले असताना आणि बेकायदा व्यवसायिकांकडून मोठ्या प्रमाणात वसुली सुरु असल्याचे सांगण्यात येत असताना आता अधिकृत व्यासायिकांकडूनही सक्तीच्या पॉटेक्शन मनीची मागणी पोलीस करत आहेत असे एका व्यवसायिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर महाराष्ट्र्र टॉक बरोबर बोलताना सांगितले .