
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची तत्काळ अमंलबजावणी करा – नरेश मणेरा यांची मागणी
ठाणे:
श्वानदंशाच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने सार्व. ठिकाणच्या भटक्या कुत्र्यांना हटवून त्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करून त्यांना पुन्हा मुळ जागी न सोडता प्राणी निवारागृहात ठेवण्याची कार्यवाही शक्य तितक्या लवकर करावी अशी मागणी माजी उपमहापौर नरेश मणेरा यांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉ.सौरभ राव यांचेकडे एका पत्राद्वारे केली आहे. भटक्या कुत्र्यांना पकडून निवारागृहात ठेवण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपविलेली आहे.
ठाणे मनपा हद्दीत विशेषतः घोडबंदर रोड विभागात भटक्या कुत्र्यांची संख्या खूपच वाढलेली असून श्वानदंशाच्या वाढत्या घटनांमुळे येथील अबालवृद्ध नागरीक प्रचंड भीती व दहशतीमुळे त्रस्त आहेत. येथील गृहनिर्माण संस्था तसेच आपण स्वतः अनेकवेळा या भटक्या कुत्र्यांवर कारवायी करणेबाबत वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे लेखी तक्रारी करूनही प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांवर ठोस व प्रभावी कारवायी केली जात नव्हती. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने याबाबत स्पष्ट निर्देश व मार्गदर्शक सूचना दिल्याने सार्व. ठिकाणच्या भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांच्या निर्बिजीकरण व लसीकरणानंतर त्यांना मुळ ठिकाणी न सोडता महापालिकेने त्यांना निवारागृहात ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा तो न्यायालयाचा अवमान ठरेल असा इशाराही नरेश मणेरा यांनी पत्रात दिला आहे.
सद्या वागळे इस्टेट येथे ठाणे महापालिकेचे ८० कुत्रे ठेवण्याची क्षमता असलेले एकच निवारागृह असून त्याचे नूतनीकरणाचे काम चालू असून ठाणे महानगरातील काही हजारात असलेली भटक्या कुत्र्यांची संख्या पाहता, यासाठी आणखी प्राणी निवारागृहे उभारणे जरुरीचे आहे याकडेही नरेश मणेरा यांनी लक्ष वेधले आहे.