
ठाणे :आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोपरी पोलिस ठाण्याच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने ही प्रतिबंधात्मक कारवाई केली.
ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार शहरात रुट मार्चचे आयोजन केले जात असून, कोपरी पोलिस स्टेशनपासून सुरू झालेला हा रूट मार्च ठाणेकरवाडी, शिवमंदिर परिसर, भाजी मार्केट, हासिजा कॉर्नर, कपडा मार्केट, सिद्धार्थ नगर, शांतिनगर, बारा बंगला या संवेदनशील व गर्दीच्या भागांतून मार्गक्रमण करत पुन्हा कोपरी पोलिस स्टेशन येथे समाप्त झाला.
या रूट मार्चमध्ये ६ पोलीस अधिकारी व ३० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. संपूर्ण मार्गावर पोलिसांची उपस्थिती, शिस्तबद्ध हालचाल आणि सतर्क नजर यामुळे समाजकंटकांना स्पष्ट इशारा देण्यात आला, तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ झाला.
निवडणूक काळात शांततापूर्ण वातावरण राखण्यासाठी, अफवा पसरविणे, दंगलसदृश परिस्थिती निर्माण करणे किंवा कायदा मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. कोपरी पोलिसांकडून पुढील काळातही अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी सांगितले.
नागरिकांनी कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिस प्रशासनाने केले आहे.