
- पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन; मृदा संवर्धनासाठी तातडीच्या कारवाईची मागणी
ठाणे : एकीकडे ‘स्मार्ट सिटी’च्या घोषणा होत असताना, दुसरीकडे ठाणे शहर सिमेंट-काँक्रिटच्या थराखाली गाडलं जात असल्याचा गंभीर आरोप पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी केला आहे. शहरात मातीच दिसेनाशी होत चालल्याने भविष्यात विद्यार्थ्यांना माती पाहण्यासाठी ‘सहली’ आयोजित कराव्या लागतील, अशी धक्कादायक भीती व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे.
ठाण्यात विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या अतिरेकी काँक्रिटीकरणामुळे जमिनीचा नैसर्गिक श्वास रोखला गेला आहे. झाडांच्या मुळांपर्यंत सिमेंट ओतले जात असून, पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी रस्त्यांवर साचत आहे. परिणामी, शहराला शहरी पूर आणि वाढत्या तापमानाच्या दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे.
डॉ. सिनकर यांनी निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे की, “ज्या मातीने शहराला आधार दिला, तीच माती आज सिमेंटखाली गाडली जात आहे. ही परिस्थिती केवळ पर्यावरणासाठीच नव्हे, तर पुढील पिढीसाठीही धोकादायक आहे.” स्मार्ट सिटीच्या नावाखाली निसर्गाचा होत असलेला बळी तात्काळ थांबवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांनी काही शाश्वत उपाययोजना सुचवल्या आहेत. शहरातील पदपथ आणि मोकळ्या जागा पाणी झिरपणाऱ्या स्वरूपात विकसित करणे, झाडांच्या मुळांवरील काँक्रिट हटवणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि सोक पिट्स सक्तीचे करणे, तसेच शहरातील काँक्रिटीकरणाचा स्वतंत्र पर्यावरणीय आढावा घेणे यांचा त्यांनी आग्रह धरला आहे.
“आज निर्णय घेतला नाही, तर उद्या परिस्थिती हाताबाहेर जाईल. निसर्ग वाचवणे ही केवळ जबाबदारी नसून आता अस्तित्वाची लढाई असल्याचे डॉ. सिनकर यांनी सांगितले आहे. दरम्यान, या निवेदनामुळे ठाण्यातील पर्यावरणीय प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले असून, शासन यावर कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.