
आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य
ठाणे : शाळेचा पहिला दिवस अजून उजाडायचा होता, पण एका दुर्गम आदिवासी गावातील ज्ञानप्रकाश शिक्षण संस्था वाडा संचलित चैतन्य विद्यालय गुंडे, तालुका शहापूर जिल्हा ठाणे या शाळेमध्ये शिक्षणाचा खरा प्रवेशोत्सव एक दिवस आधीच साजरा झाला. कारण त्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती केवळ शैक्षणिक साहित्यच नव्हे, तर त्यांच्या स्वप्नांना गती देणाऱ्या सायकलींची भेट मिळाली होती. हे सर्व शक्य झाले ते आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशनने आयोजित करण्यात आलेल्या सायक्लोएज्यू या उपक्रमामुळे.रविवारी 300 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा महत्त्वाकांक्षी उपक्रम वरील शाळेमध्ये संपन्न झाला.
डोंगर-दऱ्यांच्या कुशीत वसलेल्या अनेक वाड्या-वस्त्यांमधील विद्यार्थ्यांना रोज चार ते सहा किलोमीटरची पायपीट करून शाळेत यावे लागते. उन्हाळ्यात कडक ऊन आणि पावसाळ्यात चिखलमय वाटा पार करत शिक्षणाची ओढ जपणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी सायकल म्हणजे केवळ वाहन नाही, तर शिक्षणापर्यंत पोहोचण्याचा एक नवा मार्ग आहे.
याच भावनेतून आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशनने गरजू विद्यार्थ्यांना ५० सायकली, ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य तसेच शाळेला ५ एअर पंप दिले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ञ सुरेंद्र दिघे, जिज्ञासा ट्रस्टच्या विश्वस्त सुमिता दिघे, संस्थापिका अध्यक्ष प्रज्ञा म्हात्रे , मुख्याध्यापक दीपक देशमुख, संस्थेचे सचिव दीपेश दळवी, सदस्य, विनोद फर्डे उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिघे म्हणाले की, सायकलचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक फायदे सांगितले. सायकल चालविताना केवळ व्यायामच होत नाही, तर परिसराचे निरीक्षण करण्याची सवय लागते, जिज्ञासा वाढते आणि शिकण्याची प्रक्रिया अधिक समृद्ध होते, असे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा दररोजचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. पूर्वी शाळेत पोहोचण्यासाठी तासभर किंवा त्याहून अधिक वेळ खर्च करणाऱ्या मुलांना आता कमी वेळात शाळेत पोहोचता येणार आहे. वाचलेला वेळ अभ्यासासाठी, खेळासाठी आणि स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी वापरता येईल. विशेष म्हणजे सायकलमुळे शिक्षणाविषयीची आवड वाढण्यास आणि शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.
उपक्रमाच्या जनजागृतीसाठी संस्थेचे वरिष्ठ सदस्य चंद्रशेखर जगताप यांनी तब्बल ९५ किलोमीटर सायकल प्रवास करून दुर्गम गावापर्यंत पोहोचत समाजापुढे प्रेरणादायी उदाहरण ठेवले. टीजेएसबी सहकारी बँक, कै. महादेव विष्णू जोशी चॅरिटेबल ट्रस्ट, ठाणे, ओझोन बायसिकल कंपनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमासाठी सुप्रिया पुरी, पंकज कुंभार, अमोल कुळकर्णी, अजय भोसले, गणेश कोळी, गुरुप्रसाद देसाई, अनिकेत गद्रे, निखिल गावडे, देव जाधव, सिद्धार्थ जोशी, नरेश मालुसकर, संदीप जोशी, रोहित मांडवकर, शैलेश घोलप यांनी मेहनत केली.