
( श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा हळवा कोपरा )
लेख :- मंगेश मंदाकिनी नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष
बाप म्हणजे घराचा आधारस्तंभ, कुटुंबाचा कणा आणि आपल्या स्वप्नांना वास्तवात उतरवण्यासाठी झटणारा एक नायक. आईप्रमाणेच बापाचंही आपल्या सर्वांच्या आयुष्यात खूप मोठं योगदान असतं, परंतु जगातील प्रत्येक बाप नेहमी आपल्या भावना लपवून आपलं प्रेम कृतीतून दाखवतो.बाप म्हणजे एक अशी छाया असते जी उन्हात चालत असते पण आपल्या मुलांना सावली देत असते. त्याच्या कर्तृत्वाला, त्यागाला आणि प्रेमाला शब्दांत व्यक्त करणं अवघड आहे.श्री एकनाथजी शिंदे साहेब या मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या आणि विद्यमान उपमुख्यमंत्री असलेल्या यशस्वी राजकीय नेत्याच्या जीवनातील राखीव दोन घासांची हृदयद्रावक कहाणी आज महाराष्ट्रासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न मी आज करणार आहे.
राजकारण म्हणजे फक्त सत्तासंघर्ष नसतो, तर अनेकदा ते अंतःकरणाचा संघर्षही असतो. यातील चेहरे झळकतात ; कधी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत, तर कधी उपमुख्यमंत्रिपदाच्या किंवा मंत्रीपदाच्या खुर्चीत. पण, त्या चेहऱ्यांच्या मागे लपलेल्या वेदना फार थोड्यांना माहीत असतात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब हे अशाच एका अपार दुःखातून उभे राहिलेले नाव आहे – जे केवळ एका नेत्याचं नव्हे, तर एका पित्याच्या खोल विवंचनेचं प्रतीक आहे.मध्यंतरी राज्याचे उद्योग मंत्री श्री उदयजी सामंत साहेब यांनी एका भाषणात बोलताना इरशालवाडी दुर्घटनेचा प्रसंग सांगितला आणि संपूर्ण महाराष्ट्रासमोर श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यातील एका बापमाणसाचे – एका पित्याचे हळवे आणि संवेदनशील रूप अनुभवायला मिळाले.
आठवण :- १९ जुलै २०२३
“दरडीखाली गाडलं गेलेलं गाव… आणि एका मुख्यमंत्र्याचं किंबहुना एका बापाच्या अश्रूंनी भिजलेलं मन”
१९ जुलै २०२३. हा दिवस महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. अख्या महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः रौर्द्ररूप धारण केले होते. मुसळधार पावसाच्या सरी सर्वदूर कोसळत होत्या. पण त्या पावसाच्या थेंबांपेक्षा अधिक जड अश्रू खाली पडत होते इर्शालगडाच्या पायथ्याशी. इर्शालवाडी मध्ये.त्या मुसळधार पावसात भुस्खलन झालं आणि इर्शालवाडी हे छोटेस जिवंत गाव अचानक मातीखाली गाडलं गेलं. एक महाकाय दरड आली, आणि एका क्षणात शेकडो हसऱ्या चेहऱ्यांचं एक गाव भविष्यातील स्वप्नांसह मातीखाली गडप झालं.१९ जुलैच्या मध्यरात्री ही बातमी तत्कालीन संवेदनशील मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेबांपर्यंत पोहोचली. बातमी कळताच अस्वस्थ झालेल्या श्री एकनाथजी शिंदे यांच्या गाड्यांचा ताफा वर्षा निवासस्थानहुन इर्शालवाडीकडे निघाला. त्यावेळी मुख्यमंत्री पदावर असलेल्या या व्यक्तीने ना पदाचा विचार केला ना समोर असलेल्या संकटांचा. ते थांबले नाहीत. त्यांनी मागचा – पुढचा विचार केला नाही. त्यांनी तात्काळ निर्णय घेतला – “मी तिथेच जाईन.”
🛑 रात्रभर जागे राहिलेला महाराष्ट्राचा संवेदनशील मुख्यमंत्री नव्हे महाराष्ट्राचा पालक
संपूर्ण महाराष्ट्र थरारला होता.
मीडिया, प्रशासन, आणि हजारो नातेवाईक हतबल होते. पण त्या रात्री एक माणूस, एक नेता – रात्रभर झोपला नाही. महाराष्ट्राचे पालक असलेल्या श्री एकनाथ शिंदे साहेबांनी रात्रभर जागून आपद्ग्रस्तांसाठीचे मदत कार्य आणि बचाव मोहीमेत स्वतः प्रत्यक्ष सहभागी होत योगदान दिले.
🧸 त्या दोन चिमुकल्यांचं दुःख…
बचाव कार्य चालू असताना सकाळच्या सुमारास एक बातमी आली आणि अनेक कठीण प्रसंगांना सहजपणे तोंड देणारा, मोठ – मोठी आव्हाने लिलया पेलणारा, महाराष्ट्राचा पालक असलेला, मुख्यमंत्री पदावर असलेला एकनाथ शिंदे नावाचा उभा असलेला माणूस धप्पदिशी खाली बसला. अंतर्बाह्य हादरला. अक्षरशः कोसळला.गावातल्या एका घरात दोन लहान मुलं ( भाऊ – बहीण ) आणि त्यांचे आई-वडील – जे दरडीखाली गाडले गेले. त्यांचे मृतदेह सापडले आहेत.
ही बातमी ऐकताच – मुख्यमंत्री श्री. शिंदे साहेब गप्प झाले. त्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेदनेची लाट उसळली.
कदाचित त्यांना २५ वर्षांपूर्वीच्या स्वतःच्या दोन मुलांची आठवण झाली असेल.निःशब्द झालेल्या श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी इर्शालवाडीच्या पायथ्यावरून एव्हाना काही न बोलता निर्णय घेतला होता–“मी त्या गडावर जाईन. त्या ठिकाणी – जिथे ते लहान बहीण – भाऊ गाडले गेले.”
सहकारी मंत्री श्री उदय सामंत, श्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना गडावर दुर्घटनास्थळी जाण्यास विरोध केला. पोलीस प्रशासनाने देखील वर जाणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे असे सांगितले आणि हा अक्षरशः हात जोडून विनंती केली तर ती आपण गडावर दुर्घटना स्थळे जाऊ नये. त्यानंतर श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी छत्रपती शिवरायांचे गनिमी कावा तंत्र वापरले. श्री शिंदे साहेब यांनी इर्शालवाडीच्या पायथ्यावरून सर्व गाड्यांचा ताफा खोपोली पोलीस स्टेशनच्या दिशेने घ्यायला सांगितला. त्या ठिकाणी सहकारी मंत्री श्री उदय सामंत साहेब आणि श्री दादा भुसे साहेब यांच्या समवेत चहा घेतला आणि आता मी वर्षा निवासस्थानी निघत आहे तुम्ही देखील आपापल्या मतदारसंघांमध्ये परत जा आणि ज्या ज्या ठिकाणी पूरग्रस्तांना मदतीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी मदत करा असे सांगितले. सहकारी मंत्री श्री उदय सामंत साहेब आणि श्री दादा भुसे साहेब यांना पुढे मार्गस्थ व्हायला सांगितले आणि इकडे श्री एकनाथजी शिंदे साहेबांचा ताफा पुन्हा एकदा इरशालवाडीच्या दिशेने निघाला.
🌧️ आणि मुसळधार पावसात, धोक्याच्या सावटाखाली निसरड्या वाटेवरून श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी इर्शालवाडी गड सर करण्यास सुरुवात केली.जमीन ओलसर होती. दरड अजूनही कोसळू शकत होती.प्रशासनाने हर प्रकारे अडवण्याचा प्रयत्न केला.
पण तो केवळ एक मुख्यमंत्री नव्हता – तो त्या क्षणी एक बाप होता.
ते चढले – इर्षालगड.
मुसळधार पावसात, असंख्य अडथळ्यांची शर्यत पार करत ते चालत राहिले. कारण त्यांच्या प्रत्येक पावलामध्ये दोन निष्पाप जीवांच्या आठवणी होत्या.
🙏 त्या ठिकाणी पोहोचल्यावर…
त्या चिमुकल्या लेकरांच्या मृतदेहा पर्यंत पोहोचले आणि तेथे उभं राहून एकनाथ शिंदे साहेब थांबले.
डोळे मिटले. पाऊस वाहत होता, पण डोळ्यातले पाणी जास्त वाहत होतं.ते काही बोलले नाहीत… पण त्या पावसात, त्या मृतदेहांच्या समोर – एक मुख्यमंत्री नव्हे, तर एक बाप रडत होता.श्री एकनाथ शिंदे साहेब हे केवळ राजकीय नेते नाहीत – ते त्या दोन चिमुकल्यांच्या आठवणीत झिरपलेले एक ‘बापमाणूस’ आहेत.
“त्या दोन घासांमागे दडलेली वेदना…”
– श्री एकनाथ शिंदे साहेब यांची अंतःकरणाचा ठाव घेणारी कहाणी
राजकारणामध्ये मोठ्या मोठ्या पदांवर बसलेले नेते अनेक वेळा लोकांसाठी झगडताना दिसतात. पण त्या झगड्यामागे अनेकदा काही अशी वैयक्तिक वेदना दडलेली असते, जिची कल्पनाही लोकांना नसते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब हे केवळ एक नेता नाहीत, ते दुःख आणि वेदनेतून निर्माण झालेले गौतम बुद्धांच्या सारखे एक करुणामय हृदय आहे. एक अशा वेदनेचे सजीव उदाहरण जे आजही दररोज त्यांच्या ताटात दिसते.
२ जून २०००, २५ वर्षांपूर्वीचा एक काळा दिवस…
आपल्या कुटुंबासह मूळ गावी दरे ता.महाबळेश्वर जि.सातारा येथे सुट्टीसाठी गेले असताना मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणाऱ्या तापोळ्यात श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपल्या चिमुकल्यांना – पाखरांना नौकाविहार साठी बोटीत चढवलं आणि इथंच घात झाला.श्री एकनाथजी शिंदे साहेबांचे दोन लहान मुलं दीपेश आणि शुभदा कोयना धरणातील बॅक वॉटरमध्ये बुडाली. ते देखील त्यांच्या डोळ्यांसमोर. एक बाप म्हणून त्यांनी स्वतःचं सर्वस्व त्या पाण्यात हरवलं.त्या पाण्यात नुसते जीव नाही गेले – त्यांचं बापपण, त्यांचं घरपण, आणि एक आयुष्यभराचं हास्य हरवलं.
त्या अपघातानंतर त्यांनी सर्वांशीच बोलणं बंद केलं. त्यांनी स्वतःला आतून बंद करून घेतलं. त्यांच्या डोळ्यांमधला प्रत्येक अश्रू त्यावेळी वाहून गेला. पण त्याच वेळी एक अविरत वाहणारा शोक त्यांच्या मनात स्थायिक झाला.त्या वेदनेतून सावरायला त्यांना तब्बल दोन वर्षं लागली. दोन वर्षं ते फक्त पित्याच्या दुःखात जगले.
तेव्हा त्यांनी काहीही ठरवलं नाही – पण त्यांची आत्मा एका गोष्टीशी बांधला गेला…आणि ती गोष्ट आजही रोज त्यांच्या ताटात असते.
🍽️ राखीव दोन घास.
गेली २५ वर्षांपासून श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा नित्यक्रम चुकलेला नाही. सकाळची न्याहरी असो की दुपारचे किंवा मग रात्रीचे भोजन; कु.शुभदा आणि चि.दीपेश या आपल्या २ आवडत्या पिलांचे ते दोन राखीव घास जेवणाआधी बाजूला काढले जातात.
त्यावर पाणी फिरवलं जातं – जणू अश्रूंच्या धारा त्या घासांमध्ये मिसळत असाव्यात…ही कोणती धार्मिक परंपरा नाही.
ही आहे – एका बापाची आपल्या अपत्यांसाठी रोजची श्रद्धांजली.
ते दोन घास म्हणजे त्यांचं बोलणं आहे – त्या मुलांशी.
ते घास म्हणजे त्यांची आठवण, त्यांचं अस्तित्व, त्यांचं प्रेम.
आजही, कितीही मोठा कार्यक्रम असो, कितीही राजकीय गडबड असो – ते जेवताना आपल्या मुलांना विसरत नाहीत.
त्या दोन रिकाम्या जागा ताटात असतात – पण मनात मात्र त्या दोघांचे चेहरे अजूनही जिवंत असतात.
कधी कधी वाटतं – आपण शिंदे साहेबांना “उपमुख्यमंत्री” म्हणतो, “मुख्य नेते” म्हणतो, “जनतेचे सेवक” म्हणतो… पण “एक पित्याचं दुःख” विसरतो.
कोणतीही पदवी, कोणतीही सत्ता, कोणतंही यश – त्यांच्या मनातल्या त्या रिकाम्या जागा भरू शकत नाही.
ते दोन राखीव घास रोज त्यांना सांगतात – “तुमची दोन अपत्यं अजूनही तुझ्या सोबत आहेत,पप्पा…तुम्ही आम्हाला विसरलेला नाहीस.”
आज जेव्हा ते मंचावरून भाषण करतात, तेव्हा त्यांचे शब्द लाखो लोकांपर्यंत पोहोचतात… पण काही शब्द – ते मनातच ठेवतात.
काही वेदना – ते एकटेच झेलतात.आणि काही अश्रू – ते फक्त ताटातल्या दोन राखीव घासांवरच वाहतात…
त्या दोन राखीव घासांमागे दडलेली आहे – एका बापाची न संपणारी आठवण, न मिटणारी वेदना, आणि न बोलता वाहणाऱ्या अश्रूंची अबोल भाषा.
एकनाथ शिंदे हे केवळ नेते नाहीत…
ते एक हरवलेल्या लेकरांसाठी आजही दररोज जगणारे, त्यांच्या आठवणींवर प्रेम करणारे, आणि दुःखात माणुसकी शोधणारे एक हृदयस्पर्शी वडील आहेत.
🙏🏻 एक वाक्य म्हणावंसं वाटतं…
शब्द थांबतात तिथे, अश्रू बोलायला लागतात.
आणि शिंदे साहेबांच्या ताटातले ते दोन राखीव घास – आजही अश्रूंनी भरलेले असतात…
- मंगेश मंदाकिनी नरसिंह चिवटे,
कक्ष प्रमुख – उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष. मंत्रालय. मुंबई.