
मुंबई : राज्यभर युवासेनेची संघटनात्मक वाढ अधिक भक्कम करण्यासाठी, तसेच नव्या तरुण नेतृत्वाला संधी देत संघटनेचा विस्तार करण्याच्या उद्देशाने युवासेनेचे वार्षिक संमेलन “महायुवौत्सव २०२६” आयोजित करण्यात आले आहे. हा महायुवौत्सव दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायं ५.०० या वेळेत सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे पार पडणार आहे.
शिवसेनेचे मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब आणि युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात आयोजित हा महायुवौत्सव तरुणांसाठी एक व्यापक व्यासपीठ ठरणार असून, नव्या विचारांना चालना देणे, नेतृत्वगुणांना वाव देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार आहे. याचवेळी त्यांच्या हस्ते युवासेनेची अधिकृत वेबसाइटचे अनावरण करण्यात येणार असून, सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ आणि युवासेनेचे नवीन प्रेरणादायी गाणेही या मंचावरून प्रदर्शित केले जाणार आहे.
याशिवाय परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक, गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम, युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्री. धैर्यशील माने आणि नवनियुक्त खासदार सौ. ज्योतीताई वाघमारे आदी मान्यवर उपस्थित युवकांना मार्गदर्शन करतील. राज्य भरातून सुमारे १५ हजार युवक या संमेलनासाठी उपस्थित राहतील. युवकांसाठी येथे शिबिर ही घेण्यात येईल.
तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री. बिरदेव सिद्धाप्पा डोणे (आयपीएस), श्री. शिवानंद कुंभार, श्रीमती. पूजा गवस, श्री. सिद्धेश लोकरे, श्री. विकास हांडे या मराठी तरुणांना शिवगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या दरम्यान पक्षप्रवेश तसेच युवासैनिकांचे सत्कार करण्यात येणार आहेत.
युवासेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी आणि राज्यभरातील तरुणाईला एकत्र आणण्यासाठी आयोजित या महायुवोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी केले आहे.