
ठाणे : मतीमंद व दिव्यांग मुलांसाठी कार्य करणाऱ्या विश्वास संस्थेच्या मुलांची विशेष निसर्ग सहल नुकतीच नेरळ येथील बेंद्रे वेद ॲग्रो फार्म येथे उत्साहात पार पडली. या सहलीचे नियोजन व संपूर्ण आयोजन जिज्ञासा संस्थेने केले होते.
निसर्गाच्या सान्निध्यात आयोजित या सहलीत मुलांनी दिवसभर खेळ, मस्ती आणि आनंदाचा मनमुराद आनंद घेतला. हिरवळ, स्वच्छ हवा आणि शांत वातावरणामुळे मुलांना एक वेगळाच अनुभव लाभला. येथील गोशाळा हे या सहलीचे मुख्य आकर्षण ठरले.
गोशाळेचे प्रमुख योगेश राजपूत यांनी अतिशय सोप्या आणि रंजक पद्धतीने गोमातेचे महत्त्व मुलांना समजावून सांगितले. गायीपासून मिळणारे दूध, दही, ताक, लोणी आणि तूप यांची ओळख करून देत त्यांचे पौष्टिक मूल्यही स्पष्ट करण्यात आले. तसेच शेणाच्या गोवऱ्या, सेंद्रिय खत आणि गोमूत्र यांचे उपयोग समजावून सांगण्यात आले.
विविध जातींच्या गायी आणि बैलांची माहिती देताना मुलांनी वासरांना जवळ घेऊन त्यांच्यावर माया केली, ज्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.
जिज्ञासा संस्थेच्या सुमिता दिघे यांनी फार्ममधील विविध झाडे, फुले आणि फळांची माहिती मुलांना दिली, ज्यामुळे मुलांच्या ज्ञानात भर पडली.
या सहलीत सुरेंद्र दिघे, विश्वास संस्थेच्या मुख्याध्यापिका मीना क्षीरसागर, शिक्षक, स्वयंसेवक वसुधा मोंडकर, मंगल शिंदे, शिल्पा कर्णिक तसेच पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बेंद्रे ॲग्रो फार्मचे मालक श्याम बेंद्रे यांचे मोलाचे आणि सक्रिय सहकार्य लाभले.