
झाडे तोडलेल्या ठिकाणीच राष्ट्रवादी (श.प.) चे वृक्षारोपण
पुनःर्लागवडीऐवजी झाडे केली जाताहेत गायब
वृक्षतोड प्रकरणी अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन- मनोज प्रधान
ठाणे – ठाणे महानगर पालिका हद्दीत 8.24 किलोमीटर अंतरावरील झाडे कापण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. मात्र, ही तोडलेली झाडे कोलशेत येथे लावण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, हे आदेश धाब्यावर बसवून जिओ टॅगिंगशिवाय सुमारे 300 झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण आंदोलन करण्यात आले.
आनंद नगर ते साकेत उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे 1847 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्यापैकी जिओ टॅगिंगशिवाय 300 झाडे कापून त्यांची पुनःर्लागवड करण्यात आलेली नाही. त्यानिषेधार्थ ज्या ठिकाणी झाडे कापण्यात आली आहेत त्या सर्व्हीस रोड परिसरातच वृक्षारोपण करून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी झाडे वाचविण्यासंदर्भात फलक हातात घेतले होते.
या प्रसंगी माध्यमांशी बोलताना मनोज प्रधान म्हणाले, आनंद नगर ते साकेत दरम्यान उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. 8.24 किलोमीटरच्या या पुलाचे बांधकाम 48 महिन्यात पूर्ण करायचे असून त्यासाठी 1847.72 कोटी रूपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. या मार्गात 1 हजार 788 बाधीत होत आहेत. ही झाडे कापून त्याचे क्रमांक जिओ टॅगिंग करून कोलशेत येथे पुनःर्लागवड करण्याचे आदेश देण्यात आले असून हे काम स्वामी समर्थ इंटरप्रायझेस या कंत्राटदाराला देण्यात आलेले आहे. या कंत्राटदाराने 171 झाडे मुळापासून काढून ती कोलशेत येथे लावणे गरजेचे असताना त्याने सुमारे 300 झाडे रात्रीच्या अंधारात कापून नष्ट केली आहेत. या कामात त्याला पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही साह्य केले आहे.
दरम्यान, सुमारे 30 वर्षापूर्वी ही झाडे आपणच लावली होती. टी चंद्रशेखर हे आयुक्त असताना ही प्रक्रिया राबविण्यात आली होती. आता या झाडांची अमर्याद कत्तल होत असताना पालिका मूग गिळून गप्प आहे. आज ठाण्याचे प्रदूषण मानांकन 300 च्या घरात पोहचत आहे. त्याचे ठामपा अधिकाऱ्यांना सोयर सुतक नाही. मात्र, आपण निसर्गाचा समतोल बिघडविणार्या यंत्रणेविरोधात रणशिंग फुंकणार आहोत. ठामपाच्या सर्वसाधारण सभेत याविरोधात आमचे नगरसेवक आवाज उठवतील, असा इशाराही याप्रसंगी मनोज प्रधान यांनी दिला.
या आंदोलनात नगरसेविका मनिषा भगत , नगरसेवक सुधिर भगत, नगरसेविका दिपाली भगत, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम ,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मकसूद खान , जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम , मेहरबानो पटेल , राजु चापले, शशिकला पुजारी, मल्लिका पिल्ले , विष्णू माने , जगत सिंग, सुनील तिवारी , साहिल उदुगडे , श्रीकांत बर्वे, सौरभ वर्तक, कृणाल पाटील, वनिता भोर, दिलीप नाईक, बबन सांगळे आदी सहभागी झाले होते.