
एका वर्षात ६७ हजारांहून अधिक नागरिकांना रेबीज लस
ठाणे : कोणताही प्राणी चावल्यास तातडीने रुग्णालयात जाऊन प्रतिबंधात्मक उपचार करणे गरजेचे असते. मात्र ठाणे जिल्ह्यात कुत्रा चाव्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. जानेवारी २०२५ ते जानेवारी २०२६ या एका वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये ६७ हजार ११२ नागरिकांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करावे लागले आहे.
जिल्ह्यातील शहरी व दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये कुत्रा चाव्याच्या घटनांचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. उल्हासनगर-३ येथे सर्वाधिक १२,५९४, तर भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात ११,७९३, उल्हासनगर-४ मध्ये ९,७८८ आणि अंबरनाथ उपजिल्हा रुग्णालयात ८,४५० रुग्णांनी उपचार घेतले आहेत. ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ५,१५७ रुग्णांवर रेबीज प्रतिबंधात्मक उपचार करण्यात आले.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रेबीज हा आजार एकदा बळावल्यास प्राणघातक ठरतो. त्यामुळे कुत्रा किंवा कोणत्याही संशयित प्राण्याने चावा घेतल्यास जखम तात्काळ साबण व स्वच्छ पाण्याने धुवून, विलंब न करता लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. कुत्रा चाव्याच्या वाढत्या घटनांमुळे ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
*
जागरूकता हाच रेबीजपासून वाचण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. विशेषतः लहान मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, कारण अनेकदा भीतीपोटी मुले कुत्रा चावल्याचे पालकांना सांगत नाहीत. आपल्याकडे प्रतिबंधासाठी भटक्या कुत्र्यांची नसबंदी, लसीकरण आणि नागरिकांची जागरूकता या तिन्ही बाबी समान महत्त्वाच्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रेबीज लसीचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता तत्काळ वेळेवर उपचार घ्यावेत.”
— डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे