
- ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची २३८४ आयुष्यांची माणुसकीची गाथा
ठाणे : ज्यांच्या आयुष्यात केवळ अंधार, विस्मृती आणि एकाकीपणा चे जीवन नशिबी आले होते… ज्यांना आपल्याच माणसांनी समाजाच्या कडेला ढकलून भिंतींच्या आड विसरले होते… अशा हजारो निराधार जीवांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आशेची पहाट उजाडली आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने औषधोपचारांच्या चौकटीपलीकडे जाऊन माणुसकीचा हात पुढे करत वर्षभरात तब्बल २३८४ मानसिक रुग्णांना नवजीवन देण्याचे ऐतिहासिक तसेच माणुसकी जपणारे कार्य केले आहे.
मानसिक रुग्णालयापेक्षा घरचे वातावरण रुग्णासाठी अधिक सुरक्षित आणि स्वीकारार्ह असते. मात्र वास्तव वेगळे आहे. अनेक वेळा अज्ञात रुग्ण असतात किंवा नातेवाईक त्यांना स्वीकारण्यास टाळाटाळ करतात व मानसिक आजारी रुग्ण घरी असणे ही समाजात अस्वीकार्य बाब असते . अशा परिस्थितीत रुग्णांना घरी परत पाठवणे हे रुग्णालयासाठी मोठे आव्हान ठरते. तरीही जानेवारी २०२५ ते २०२६ या कालावधीत रुग्णालयाने अशा विपरीत परिस्थितीत हार न मानता २२५७ रुग्णांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून त्यांना पुन्हा घरचा उंबरठा ओलांडण्याची व समाजाच्या मुख्यप्रवाहत पुन्हा सामील होण्याची संधी मिळवून दिली.
या माणुसकीच्या मोहिमेत ४४ अज्ञात रुग्णांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या मूळ गावी व कुटुंबात पोहोचवण्यात रुग्णालयाला यश आले. तर काही रुग्ण इतक्या वर्षांपासून रुग्णालयात होते की त्यांना घरचा रस्ता देखील आठवत नव्हता. अशा ३४ दीर्घकालीन रुग्णांना डॉक्टर आणि कर्मचारी स्वतः ‘एस्कॉर्ट’ बनून सुरक्षितपणे त्यांच्या घरी घेऊन गेले. ज्यांचे कोणीही नातेवाईक उरले नाहीत, ज्यांना स्वीकारायला कोणीच पुढे आले नाही, अशा ४९ निराधार रुग्णांना सन्मानाने पुनर्वसन केंद्रात दाखल करून व त्यांना व्यवसायिक रित्या सक्षम बनवून रुग्णालयाने आपली सामाजिक जबाबदारी आणि ‘पालकत्वाची’ भूमिका प्रामाणिकपणे निभावली आहे.
मानसिक आजार पूर्णपणे बरा होतो का, याबाबत समाजात आजही गैरसमज आणि साशंकता आहे. मात्र ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय केवळ उपचारांपुरते थांबत नाही. रुग्ण समाजात टिकून राहावा, स्वाभिमानाने जगावा, यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि स्वावलंबनाचे मार्ग खुल्या मनाने उभे केले जात आहेत. काम, आत्मविश्वास आणि स्वीकार मिळाला, तरच रुग्णाचे पुनर्वसन खऱ्या अर्थाने पूर्ण होते, या भावनेतून हे प्रयत्न सुरू आहेत. अंधारमय कोठडीतून मुक्त होऊन पुन्हा एकदा हसणारी, बोलणारी, स्वप्न पाहणारी २३८४ आयुष्ये हीच ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची सामाजिक बांधिलकी जपणारी खरी ओळख आणि सर्वात मोठी उपलब्धी आहे.
*
“मानसिक रुग्ण हे आमच्यासाठी केवळ उपचाराचे ‘केस’ नाहीत, ते माणसं आहेत. औषधांसोबत मायेचा स्पर्श आणि विश्वास मिळाला, तर रुग्ण पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. एखादा रुग्ण बरा होऊन आपल्या घरी परत जातो, तो क्षण आमच्यासाठीही समाधानाचा आणि अभिमानाचा असतो.”
— डॉ. नेताजी मुळीक
अधिक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे