
ठाणे : स्वर्गीय मुकुंद केणी यांच्या संकल्पनेला मूर्तरूप देत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली कळवा येथे साकारलेल्या ‘संगीत उद्यानाला’ खासदारांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर पाहणी केली. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक मंदार केणी यांनी त्यांना या उद्यानाची माहिती दिली
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून विविध थीमवर आधारित उद्याने उभारण्यात येत आहेत. त्यातील काही उद्याने दुर्लक्षितपणामुळे नामशेष पावली तर, काही उद्याने मात्र आजही सुस्थितीत आहेत. दरम्यान, कळवा परिसरात आता अशाचप्रकारे संगीत प्रेमींसाठी अनोखे उद्यान उभारण्यात आले आहे. याठिकाणी ठाण्यातील संगीत प्रेमींना , कलाकारांना आपली कला सादर – करण्याबरोबरच सराव करता येणार आहे.कळवा नाक्यावर साकरण्यात आलेल्या या अनोख्या उद्यानाचे लोकार्पण रविवारी करण्यात आले. कळव्यात अनेक कलाकार आहेत. परंतु त्यांना सराव किंवा आपल्या कला सादर करण्यासाठी हक्काचे असे व्यासपीठ उपलब्ध नव्हते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन संगीतप्रेमीसाठी उद्यान उभारण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कळव्यातील शिंदे सेनेच्या माजी नगरसेविका प्रमिला केणी आणि त्यांचे पुत्र मंदार केणी यांच्या संकल्पनेतून हे उद्यान साकारण्यात आले आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी काही संगीत प्रेमींच्या हस्ते या उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले होते . या आगळ्या वेगळ्या संगीत उद्यानाची नुकतीच खा . शिंदे यांनी पहाणी केली .
संगीत, कला आणि निसर्ग यांचा सुरेख संगम साधणाऱ्या या उद्यानाच्या उभारणीत डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन आणि योगदान लाभले आहे. उद्यानातील संगीतमय रचना, सांस्कृतिक वारसा जपणारी मांडणी आणि नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेली ही सकारात्मक जागा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.नव्या पिढीला भारतीय संगीताकडे आकर्षित करणारे आणि सांस्कृतिक जाणीव वृद्धिंगत करणारे हे उद्यान कळव्याच्या वैभवात भर टाकत असून, या अभिनव उपक्रमासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी संकल्पनाकार स्वर्गीय मुकुंद केणी यांना यावेळी आदरांजली अर्पण केली.