
ठाणे – श्री गणेश नृत्य कला मंदिराच्या ५० वर्षांच्या यशस्वी प्रवासानिमित्त श्री गणेश कल्चरल अकॅडमी व श्री गणराज नृत्य कला निकेतन यांच्या वतीने एन.सी.पी.ए.च्या सहकार्याने ‘परंपरा’ हा विशेष कथक नृत्यप्रयोग 31 जानेवारी रोजी ठाण्यात सादर केला जाणार आहे. भारतीय शास्त्रीय नृत्याच्या क्षेत्रातील ज्येष्ठ कथक गुरु डॉ. मंजिरी देव यांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गेल्या पाच दशकांहून अधिक काळ डॉ. मंजिरी देव यांनी अनेक पिढ्यांतील विद्यार्थ्यांना कथक नृत्याचे संस्कार दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या असंख्य शिष्या आज नामवंत कलाकार, आदरणीय गुरु तसेच स्वतःच्या नृत्यसंस्थांचे प्रमुख म्हणून कथकची समृद्ध परंपरा पुढे नेत आहेत.
कार्यक्रमाच्या नावाप्रमाणेच ‘परंपरा’ हा प्रयोग गुरु–शिष्य परंपरेला समर्पित आहे. या भव्य सादरीकरणात २०० हून अधिक विद्यार्थी आणि २५ पेक्षा अधिक नृत्यसंस्था सहभागी होत असून, एकाच मंचावर परंपरा, अनुशासन आणि कलात्मक उत्कृष्टतेचा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे.कार्यक्रम शनिवार, ३१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ९ यावेळेत दादा कोंडके अॅम्फीथिएटर, धर्मवीर नगर, तीन हात नाक्याजवळ, ठाणे (पश्चिम) येथे आयोजित केला असून प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे.
पन्नास वर्षांचा हा प्रवास केवळ कालावधी नसून तो असंख्य जीवनांना आकार देणारा, शास्त्रीय नृत्याची तंत्रशुद्धता जपणारा आणि कथकचा आत्मा जिवंत ठेवणारा एक अखंड वारसा आहे. प्रत्येक पाऊल, प्रत्येक ताल आणि प्रत्येक चक्रामध्ये गुरु ते शिष्यापर्यंत पोहोचलेल्या ज्ञानाचा, साधनेचा आणि समर्पणाचा ठसा उमटलेला आहे.या कार्यक्रमाचे संयोजन कथक गुरु डॉ. मंजिरी देव यांच्या ज्येष्ठ शिष्या नृत्यालंकार सौ. मनाली देव यांनी डॉ.मंजिरी देव यांच्या इतर शिष्यांच्या सहकार्याने केले आहे.हा कार्यक्रम भारतीय शास्त्रीय नृत्याच्या वंशपरंपरेची ताकद, प्रशिक्षणाची खोली आणि सांस्कृतिक परंपरेचा अविरत प्रवाह अधोरेखित करतो.