
* बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे याला भाजपानं स्वीकृत नगरसेवकपद दिल्याने संतापाची लाट
ठाणे : कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत भाजपाच्या दोन, शिवसेनेच्या दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याची निवड करण्यात आली. बदलापूर पालिका निवडणुकीच्या निकालानंतर, शुक्रवारी नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात पार पडलेल्या पहिल्या सभेत एकूण पाच स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर करण्यात आली. खळबळजनक बाब म्हणजे तुषार आपटे याचीही यादीत निवड करण्यात आली. तुषार आपटे हा त्याच्या शाळेमधील दोन अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणी सहआरोपी आहे. मात्र त्याच्या निवडीबाबत भाजपा नेते चिडीचूप असल्याचं दिसून आल्यानं नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याने पेटले होते बदलापूर
: बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाल्याची बातमी समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. बदलापूरमध्ये नागरिकांनी निदर्शनं करुन रेल्वे वाहतूक रोखून धरली. संपूर्ण बदलापूर शहर बंद ठेवण्यात आले. हा रोष इतका शिगेला पोहोचला होता की, मंत्री गिरीश महाजन यांना आंदोलकांची समजूत काढायला जावं लागलं. तरीही आंदोलकांनी ऐकलं नाही. लहान मुलींचं लैंगिक शोषण झाल्याचं प्रकरण उघडकीला येऊ नये, म्हणून शाळा प्रशासनानं बरीच लपवाछपवी केल्याचं समोर आलं. काही पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणात गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला. अखेर हे प्रकरण तापल्यानंतर पोलिसांनी शाळेच्या संस्थाचालकांवर गुन्हा दाखल केला होता .
शाळेचे अध्यक्ष, सचिवालाही आहेत सहआरोपी
बदलापूर शहरासह राज्याला हादरवणाऱ्या दोन चिमुकल्यांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळेचे अध्यक्ष, सचिव यांनाही आरोपी करण्यात आलं आहे . बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात तक्रार देण्यास असमर्थ ठरल्याच्या 21 (2) या कलमाखाली शाळेच्या संस्थाचालकांवर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला आहे . या प्रकरणावरून मोठं राजकारणही रंगलं. यात संस्थेचा सचिव तुषार आपटे हा दीड महिने फरार होता त्याला त्यानंतर ४८ तासात जामिनही मिळाला. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. “स्वीकृत सदस्यांच्या निवडी प्रकरणी ठाणे जिल्हा प्रशासनाने भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वीकृत नगरसेवकांच्या यादीला मान्यता दिली. यात तुषार आपटे, (भाजपा) शागोफ गोरे (भाजपा) तर प्रभाकर पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस ) दिलीप बैकर, हेमंत चतुरे ( शिवसेना ) यांची निवड स्वीकृत सदस्य पदी केली आहे,” अशी माहिती बदलापूर नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली.