
ठाणे सिव्हिल रुग्णालयात रजोनिवृत्ती कक्षाची सुरुवात
ठाणे : स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा, मात्र अनेकदा दुर्लक्षित राहणारा टप्पा म्हणजे रजोनिवृत्ती. या काळात होणारे शारीरिक बदल, मानसिक अस्वस्थता, आजारांची सुरुवात याकडे समाजात फारसे लक्ष दिले जात नव्हते. मात्र आता ही पोकळी भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पुढाकारातून ठाणे सिव्हिल रुग्णालयात रजोनिवृत्ती कक्ष (Menopause Clinic) सुरू करण्यात आला आहे.
या विशेष कक्षामार्फत रजोनिवृत्तीच्या कालावधीत महिलांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन, समुपदेशन व उपचार दिले जाणार आहेत. दर बुधवारी हा कक्ष केवळ महिलांसाठी खुला ठेवण्यात आला असून, महिलांना स्वतंत्र व सुरक्षित वातावरणात आरोग्यसेवा मिळणार आहे. या कक्षाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाली राहुड, डॉ. शीतल कासट, डॉ. अर्चना पवार, डॉ. शुभांगी अंबाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोन्समधील बदलांमुळे महिलांना झोप न लागणे, चिडचिड, चिंता, नैराश्य, स्मरणशक्ती कमी होणे, सांधेदुखी, हाडांची झीज (ऑस्टिओपोरोसिस) तसेच हृदयविकाराचा धोका वाढणे यासारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या सर्व बाबींची सखोल तपासणी करून योग्य उपचार पद्धती या कक्षात सुचवण्यात येणार आहेत.
या कक्षात स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी तसेच समुपदेशक यांची मदत उपलब्ध राहणार असून, आवश्यक त्या तपासण्या, औषधोपचार आणि जीवनशैलीविषयक सल्ला दिला जाणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
*महिलांनी संकोच न बाळगता या राजोनिवृत्ती कक्षाचा लाभ घ्या
महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, वयानुसार होणारे नैसर्गिक बदल लवकर ओळख होणे आणि उपचारांचा दर्जा उंचावणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. महिलांनी संकोच न बाळगता या राजोनिवृत्ती कक्षाचा लाभ घ्यावा,
डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे)