
भाजप नेते मंत्री आशिष शेलार यांनी उडवली विरोधकांची खिल्ली
ठाणे: राज्यभरातील २९ महापालिकांच्या निवडणुकीची माहिती घेतली, बऱ्याच ठिकाणी गेलो. त्यामुळे, जवळपास सर्वच महापालिका निवडणुकांच्या निकालात महायुतीची त्सुनामी येणार आहे. आणि ठाण्यात तर विरोधक हाताच्या बोटावर मोजण्या इतपत तरी येतील का ? हा खरा प्रश्न आहे. अशी खिल्ली भाजप नेते मंत्री आशिष शेलार यांनी विरोधकांची उडवली.
ठाणे महापालिका निवडणूकीच्या प्रचारार्थ भाजप नेते आशिष शेलार रविवारी ठाण्यात आले होते.ना. शेलार यांनी, घोडबंदर परिसर तसेच मानपाडा प्रभागातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचे उद्घाटन केले. तर, रात्रौ प्रभाग क्र.५ (ड) मधील भाजपा,शिवसेना,रिपाई महायुतीचे उमेदवार सिताराम राणे यांच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले तसेच, प्रभाग ५ मधील महायुतीचे उमेदवार जयश्री डेविड आणि परिषा सरनाईक उपस्थित होत्या. यावेळी, माध्यमांशी बोलताना आशिष शेलार यांनी, ठाकरे बंधुंच्या वक्तव्यांचा आणि नुकताच जाहिर केलेल्या वचननाम्याचा खरपुस शब्दात समाचार घेतला. पुढे बोलताना त्यांनी, येणाऱ्या १६ तारखेचा निकालात सर्वच महापालिकांमध्ये महायुतीच्या विजयाची त्सुनामी येणार आहे. आणि ठाण्याचा विजय हा तर अभूतपूर्व असणार असुन इथे विरोधक हाताच्या बोटावर मोजण्या इतपत तरी निवडून येतील का ? अशी खिल्ली आशिष शेलार यांनी उडवली. विरोधकांच्या आक्रोशाबद्दल छेडले असता शेलार यांनी, पालिकेच्या निवडणूका सुरू होण्याआधीच विरोधकांनी आपली शस्त्रे खाली टाकल्याची टीका केली. तसेच, पराभवाची चाहूल लागल्याने पराभवा पूर्वीच्या पार्श्वभूमीसाठी विरोधक काहीबाही आरोप करीत असल्याचे ना. शेलार म्हणाले.