
- कवी बाळ कांदळकर यांच्या पुढाकारातून ज्येष्ठांसाठी आपुलकीचे व्यासपीठ; विजया लासे, मनोज लासे यांचे सहकार्य
ठाणे : प्रतिनिधी
मैत्रीचा सुगंध, जुन्या आठवणींचा गंध आणि हरवलेल्या बालपणाचा आनंद पुन्हा अनुभवण्यासाठी पारसिक, कळवा येथे सुरू झालेल्या ‘जोशी कट्ट्या’ला आता खुल्या व्यायामशाळेची जोड मिळाली आहे. कवी बाळ कांदळकर यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या उपक्रमामुळे ज्येष्ठांना विरंगुळ्यासोबत आरोग्य जपण्याचीही संधी उपलब्ध झाली आहे.
ज्येष्ठ मित्रमंडळींच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, त्यांना आपली सुख दुःखं मनमोकळेपणाने व्यक्त करता यावीत, जुन्या आठवणींना उजाळा मिळावा आणि थोडी मौजमस्ती करत बालपण पुन्हा अनुभवता यावे, या उदात्त हेतूने कवी बाळ कांदळकर यांनी ‘जोशी कट्ट्या’ची स्थापना केली. त्यांच्यातीलच ज्येष्ठ मित्र प्रभाकर जोशी यांच्या नावाने या कट्ट्याचा जन्म झाला.
आता या कट्ट्याला अधिकृत जागा मिळाली असून, येथे खुली व्यायामशाळा उभारून व्यायामाची विविध साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. स्थानिक नगरसेविका विजया लासे यांनी आपल्या प्रभाग सुधारणा निधीतून हे काम करून दिले. त्यांचे यजमान तथा माजी नगरसेवक मनोज लासे यांनीही या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.
या खुल्या व्यायामशाळेचे उद्घाटन सौ. विजया लासे आणि श्री. मनोज लासे यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठांच्या विरंगुळ्यासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येण्यासाठी आणि आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे.
*
ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्यांच्या मनात फुलणारा आनंद, हेच माझ्या ‘जोशी कट्ट्या’चे खरे यश आहे. ज्येष्ठांना आपुलकीचं हक्काचं ठिकाण मिळालं, यापेक्षा मोठं समाधान नाही.
बाळ कांदळकर (कवी, ठाणे)