
- नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी डॉ. प्रशांत सिनकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
ठाणे : कोकणातील वाशिष्ठी नदीवरील गाळ काढणी आणि खोलीकरणाच्या यशस्वी कामांनंतर, ठाणे जिल्ह्यातील नद्यांचे संवर्धन करण्यासाठी त्याच मॉडेलची अंमलबजावणी करण्याची मागणी पुढे आली आहे. पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत या संदर्भात तातडीने व्यापक धोरण राबवण्याची गरज व्यक्त केली आहे.
चिपळूण परिसरातील वाशिष्ठी नदीत महाराष्ट्र जलसंपदा विभाग यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या गाळ काढणी (डी-सिल्टिंग) आणि खोलीकरणाच्या कामांमुळे पूरस्थितीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. हे मॉडेल राज्यातील इतर भागांसाठी दिशादर्शक ठरत असून ठाणे जिल्ह्यातही त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरत आहे.
ठाणे जिल्ह्यातील वैतरणा, तानसा, उल्हास, भातसा, काळू, शाई, बारवी, मुरबाडी, पोशिर, शिलार, पेज यांसारख्या नद्या या पर्यावरण, पाणीपुरवठा आणि शेतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मात्र वाढते शहरीकरण, नदीपात्रांवरील अतिक्रमण आणि गाळ साचण्याच्या समस्येमुळे या नद्यांची वहन क्षमता घटत चालली आहे. परिणामी, अतिवृष्टीच्या काळात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
डॉ. सिनकर यांनी सादर केलेल्या निवेदनात सर्व नद्यांचे वैज्ञानिक सर्वेक्षण, टप्प्याटप्प्याने गाळ काढणी, अतिक्रमण हटविणे, पाणलोट क्षेत्र संवर्धन, तसेच काँक्रीटीकरणावर नियंत्रण ठेवण्याच्या उपाययोजनांचा समावेश आहे. याशिवाय “नदी संवर्धन प्राधिकरण” स्थापन करून सातत्यपूर्ण देखरेख ठेवावी आणि नागरिकांच्या सहभागातून ‘नदी मित्र’ उपक्रम राबवावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
“नद्या या केवळ पाण्याचा स्रोत नसून संपूर्ण पर्यावरण व्यवस्थेचा आत्मा आहेत. त्यांचे संवर्धन ही काळाची गरज आहे,” असे मत डॉ. प्रशांत सिनकर यांनी व्यक्त केले.
ठाणे जिल्ह्यातील पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी आणि संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी शासनाने वेळेत निर्णय घेणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.