
* टेंडर काढून मलिदा लुटला मात्र योग्य नियोजन नसल्यामुळे महत्वाचे प्रकल्प अर्धवट
* राजकीय नेत्यांना रेड कार्पेट मात्र स्थानिक भूमिपुत्रांची ससेहोलपट
ठाणे : ठाणे जिल्ह्याचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि ठाणे आणि लगतच्या परिसरातील विकासकामांसाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून हजारो कोटींचा निधी मंजूर झाला . जिल्ह्याचे विकासाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी
भरभरून निधी ठाणे , भिवंडी , कल्याण डोंबिवली , उल्हासनगर ,या अंबरनाथ , नवी मुबंई , रायगड आणि पालघर परिसरातील विकासकामांना दिला . विशेष म्हणजे बहुतांशी प्रकल्पासाठी भूसंपादन झालेले नसताना टेंडर काढण्यात आली , कोट्यवधींचा मलिदा उकळण्यात आला . दुसरीकडे नियोजनाचा अभाव आणि भूसंपादन रखडल्याने बहुतांशी प्रकल्प अर्धवट स्थितीत असल्याचे खळबळजनक वास्तव उघडकीस आले आहे . ज्या राजकीय नेत्यांच्या जमिनी या प्रकल्पांसाठी गेल्या त्यांना सढळ हाताने मोबदला दिला गेला तर स्थानिक भूमिपुत्रांची मात्र मोबदला मिळवण्यासाठी ससेहोलपट होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत .
भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात लांब शहरी बोगदा रस्ते मार्ग म्हणजे ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प अत्यंत वेगाने आकार घेत आहे.एमएमआरडीएतर्फे उभारण्यात येत असलेला आणि ११.८ किमी लांबीचा बोगदा प्रकल्प ठाणे येथील घोडबंदर रोडला थेट पश्चिम द्रुतगती महामार्गाशी जोडणार आहे. या भूमिगत मार्गामुळे ठाणे ते बोरिवलीपर्यंतचा २३ किमीचा प्रवास, ज्याला सध्या ६०-९० मिनिटे लागतात, तो अवघ्या १५ मिनिटांतंच पूर्ण होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ठाणे ते बोरिवली महामार्गाच्या निर्मितीत दररोज मोठ्या प्रमाणात मातीचे उत्तखनन करण्यात येत आहे . त्यामुळे या परिसरात धुळीचे प्रमाण वाढले असून नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत या विरोधात नागरिक रस्त्यावरही उतरले होते . दुसरीकडे घोडबंदर रस्त्यावर दिवसा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. त्यातच दररोज उत्तखनन केलेली तीनशे ट्रक माती वाहतूक करून भिवंडी परीरातील डम्प करण्याचे काम प्रशासनाला करावे लागत असल्याने या परिसरातील वाहतूक कोंडीत मोठी वाढ झाली आहे .
* मेट्रोच्या कामाची रखडपट्टी घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी , माजिवडा , भिवंडी परिसरात मेट्रोच्या खांबावर गर्डर बसविण्याचे काम एमएमआरडीए कडून केले जात आहे . घोडबंदर मार्गावर वडाळा घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या कामामुळे घोडबंदर भागातील मुख्य रस्ते, सेवा रस्त्यांवर ठिकठिकाणी मार्गावरोधक उभारण्याल आले आहे. या मार्गावरोधकामुळे मुख्य मार्गिका अरुंद झाली असून त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होतो.मेट्रो कामाचा भाग असलेल्या कापूरबावडी मेट्रो स्थानकाच्या निर्माणाचे काम कापूरबावडी उड्डाणपूलालगत सुरु आहे. या कामासाठी मेट्रोच्या खांबावर गडेर उभारले जात आहे. भिवंडी परिसरात एमएमआरडीए माध्यमातून मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अंजुरफाटा ते अंजुर चौक ही मार्गिका सर्व वाहनांसाठी मध्यरात्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . येथील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात येत असून पर्यायी मार्गावर कोंडी वाढली आहे . ठाणे- भिवंडी-कल्याण या मेट्रो पाच मार्गिकेच्या निर्माणाचे काम सध्या भिवंडीत सुरू आहे. या कामाचा भाग म्हणून भिवंडी येथील अंजुरफाटा ते अंजुर चौक भागात एमएमआरडीएकडून गर्डर उभारले जात आहेत विशेष म्हणजे या कामासाठीही योग्य पद्धतीने भूसंपादन झाले नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मेट्रोचे काम रखडले आहे .
* बाळकूम – गायमुख प्रकल्प खर्चात मोठी वाढ
बाळकुम – गायमुख ठाणे खाडी कोस्टल मार्गाच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे , सहा वर्षांपूर्वी या प्रकल्पासाठी १३१६.१८ कोटी खर्च अपेक्षित होता मात्र दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीएने २६७४ कोटीच्या खर्चाला मंजुरी दिली असताना गेलाय वर्षी राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी अर्थसंकल्पात ३ हजार ३६४ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली होती . त्यामुळे या मार्गाच्या खर्चात अवघ्या काही वर्षात सुमारे तिपटीने वाढ झाली असल्याचे उघड झाले आहे . बाळकूम ते गायमुख असा कोस्टल रोड गेल्या १६ वर्षांपासून रखडला असल्याचे उघड झाले होते मात्र या महत्वाच्या रोडची रखडपट्टी सुरु असताना २०२१ साली खारीगाव ते गायमुख या नव्या १२०० कोटी रुपयांच्या खर्चाच्या कोस्टल रोडला मंजुरी देण्यात आली होती . दरम्यान ठाणे पालिकेने टीडीआरच्या बदल्यात ७० टक्के जागेचे भूसंपादन करण्यात येणार असल्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला होता . या रस्त्याचे काम पूर्ण लवकरात लवकर करण्याचे प्रयत्न असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत होता . टीडीआर देण्याची योजना महापालिका प्रशासनाने राबविल्यामुळे महापालिकेला एकही पैसा खर्च न करता रस्त्याला लागणाऱ्या जमिनीपैकी बहुतांशी जमीन हस्तांतरित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत मात्र बऱ्याच शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव नाकारला असल्याने भूसंपादन रखडले आहे.
* माणकोली भुयारी मार्ग कागदावरच
कल्याण आणि डोंबिवलीकरांचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी माणकोली पूल प्रास्तवित आहे . या खाडी पूलाच्या दिशेने ये जा करण्यासाठी मुंबई-नाशीक महामार्गावर भुयारी मार्ग काढण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीएने घेतला आहे. मुंबई, नाशिक येथून येणाऱ्या वाहनांसाठी मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर माणकोली येथून वळण घेत हा भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. महामार्गावरुन माणकोली पुलावर जाण्यासाठी स्वतंत्र्य मार्गिका उपलब्ध होणार असल्याने याठिकाणी होणारी वाहतूककोंडी कमी होईल असा दावा करण्यात येत आहे. हा भुयारी मार्ग बांधण्यासाठी ५७ कोटी रुपयांचा खर्च निर्धारित करण्यात आला असला तरी काम ला कधी सुरवात होणार आणि या मार्गावरची कोंडी कधी टळणार याचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही . मुंबईतून मोठागाव माणकोली पुलावर येणाऱ्या आणि डोंबिवलीतून मुंबई, नाशिक येथे जाणाऱ्या माणकोली गावा जवळ मुंबई-नाशिक-आग्रा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर गोलाकार वाहतूक रिंगण तयार होणार आहे. त्याचमुळे एमएमआरडीएने या महामार्गाजवळ भुयारी मार्ग तयार करण्याचे ठरवले आहे. याच अंतर्गत डोंबिवली बाजूकडील माणकोली पूल ते मोठागाव, रेतीबंदर फाटक रस्त्यांची कामेही करण्यात येणार आहेत तसेच या प्रकल्पांसाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची कामे कधी मार्गी लागणार हाही एक प्रश्नच आहे .
* मोठा गाव माणकोली पुलाचे काम पूर्ण मात्र उदघाटन नाही
माणकोली खाडी पूलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. हा खाडी मार्ग ठाणे-कल्याण, डोंबिवली यासारख्या शहरा दरम्यान वाहतुकीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. शीळ-कल्याण मागार्वर दररोज मोठी कोंडी होत असते. या नव्या मार्गामुळे या मार्गावर वाहनांचा ताण काही प्रमाणात कमी होणार आहे. माणकोली ते डोंबिवली दरम्यान उल्हास खाडीवर सहापदरी पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर असून या प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. हा पुल ठाणे आणि मुंबईत जलदगतीने पोहचता येणार आहे. एमएमआरडीएच्यावतीने या सहा पदरी पुलाचे काम उल्हास खाडीवर करण्यात येत आहे. डोंबिवली आणि भिंवडीकरांना या पुलाचा फायदा होणार आहे. त्यांना अवघ्या वीस मिनिटात रस्ते मार्गाने ठाण्यात पोहचता येणार आहे.डोंबिवली आणि ठाणे दरम्यान लोकल सेवा बंद असल्यास हा पर्यायी मार्ग मिळणार आहे. माणकोली ते मोठागाव पुलाने डोंबिवली ते ठाणे या प्रवासाला अवघे 20 ते 30 मिनिटे लागतील. उल्हासनदीला पार करण्यासाठी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याहून पुढे जाण्यासाठी सध्या कोणताही पुल नाही. ज्यांना ठाणे ते डोंबिवली रस्ते मार्गाने प्रवास करण्यासाठी त्यामुळे प्रचंड ट्रॅफीक जामचा सामना करावा लागत असतो.प्रवाशांना मुंबई ते नाशिक महामार्गाने कोनगाव, दुर्गाडीहून कल्याण पूर्वपर्यंत राजनोली फोर्कच्या माध्यमाने प्रवास करावा लागतो. यामुळे डोंबिवली ते ठाणे प्रवासाला दीड तासांचा वेळ लागतो. प्रवाशांचा हा वेळ वाचण्यासाठी माणकोली जवळ या सहा पदरी पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. पुल एकदा का सुरु झाली की हे अंतर कमी होऊन केवळ अर्धा तास लागणार आहे परंतु काम पूर्ण होऊनही उदघाटन झाले नसल्याने हा पूल रखडला आहे .