
- सहा वर्षांच्या चिमुकल्याचे प्राण वाचवले
ठाणे : सहा वर्षीय चिमुकल्यावर कुत्र्याने अचानक हल्ला करून डोक्याला व चेहऱ्याला गंभीर चावा घेतल्याने मोठा अनर्थ ओढवला होता. रक्तबंबाळ अवस्थेत कुटुंबीयांनी तत्काळ त्याला ठाणे जिल्हा सिव्हिल रुग्णालय येथे दाखल केले. परिस्थिती अत्यंत गंभीर असतानाही सिव्हिलच्या डॉक्टरांनी वेळीच हस्तक्षेप करत अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडून चिमुकल्याचे प्राण वाचवले.
शहापूर खारवली येथे राहणारा सिद्धार्थ वाघ हा चिमुकला अंगणात खेळत होता. खेळताना चेंडू आणायला गेलेल्या सिद्धार्थ वर कुत्र्याने हल्ला केला आणि डोके आणि चेहऱ्यावर मोठा चावा घेऊन जबर जखमी केले
रुग्णालयात दाखल होताच आपत्कालीन विभागातील वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार सुरू केले. डोक्यावरील खोल जखमा, चेहऱ्यावरील गंभीर दुखापत आणि मोठ्या प्रमाणातील रक्तस्राव पाहता क्षणोक्षणी परिस्थिती आव्हानात्मक होत होती. मात्र डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. साधारण एक तास चाललेली ही जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. असल्याची माहिती प्लॅस्टिक सर्जन डॉ. अभिषेक धाकड यांनी दिली.
“बालकाची स्थिती अत्यंत गंभीर होती. वेळेत उपचार मिळाले नसते तर परिणाम गंभीर झाले असते. मात्र संपूर्ण वैद्यकीय पथकाच्या प्रयत्नांमुळे आता त्याची प्रकृती स्थिर आहे.”
शस्त्रक्रियेनंतर चिमुकल्याला प्रकृती हळूहळू सुधारत असल्याची माहिती देण्यात आली. आवश्यक लसीकरण आणि पुढील उपचारांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
या घटनेनंतर कुटुंबीयांनी सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांचे आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले. “आमच्यासाठी ते देवदूतच ठरले,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दुर्गम भागातील रुग्णांना तातडीची आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याची क्षमता सिव्हिल रुग्णालयाकडे आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी वरिष्ठ सर्जन डॉ. निशिकांत रोकडे, प्लॅस्टिक सर्जन डॉ. अभिषेक धाकड, डॉ. प्रियंका महांगडे, डॉ. ओमकार भोसले, डॉ. सुशील दुबे आदींनी अथक परिश्रम घेतले.
*
“लहान मुलांच्या जखमा केवळ वैद्यकीय आव्हान नसतात, तर ती भावनिक जबाबदारीही असते. बालकाची स्थिती गंभीर होती, मात्र योग्य वेळी उपचार सुरू केल्याने आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणू शकलो. सध्या त्याची प्रकृती सुधारत आहे. पुढील एक वर्ष त्याच्यावर औषधोपचार सुरू ठेवणार आहोत.
डॉ. अभिषेक धाकड (प्लॅस्टिक सर्जन, सिव्हिल रुग्णालय)