
निवडणूक प्रमुख आमदार संजय केळकर यांची कामगिरी
ठाणे : महापालिका निवडणुकीत भाजपाने कमी जागा लढवत तब्बल ७४ टक्के स्ट्राइक रेट ठेवून ३८पैकी २८ नगरसेवक निवडून आणले. या कामगिरीबाबत भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार संजय केळकर यांचे पक्ष वर्तुळात कौतुक होत आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत भाजपची शिवसेना शिंदे गटाशी युती न होता स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका आमदार संजय केळकर यांची होती. मात्र प्रदेश स्तरावर ज्येष्ठ नेत्यांनी महायुतीचा निर्णय घेतल्यानंतर भाजपने ठाण्यात युती धर्म पाळत निवडणूक लढवली. यासाठी निवडणूक प्रमुख म्हणून आमदार संजय केळकर यांची पक्षाने नियुक्ती केली. श्री. केळकर यांच्या विधान परिषद सदस्यपदाच्या कार्यकाळानंतर त्यांनी विधानसभेच्या आमदारकीची निवडणूक तीनवेळा जिंकली. त्यांची ठाणे शहरातील चौफेर विकासकामे आणि दीर्घकालीन सामाजिक कार्यावर खऱ्या अर्थाने ठाणेकरांनी पसंतीची मोहोर उमटवली. त्यांच्या मतदार संघात महायुतीचे 35 पैकी 31 उमेदवार निवडून आले.
शहरात विविध क्षेत्रात केलेल्या कामांबरोबरच आमदार आपल्या दारी आणि जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमांच्या माध्यमातून लोकांच्या आणि गृहसंकुलांच्या अडचणी सोडवत शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यात ते यशस्वी ठरले. या उपक्रमांना नागरिकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. याचा फायदा नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत पक्षाला झाला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
जागावाटपात १३१ पैकी किमान ५० ते ५५ जागा मिळाव्यात याबाबत श्री. केळकर यांनी कायम आग्रह धरला होता. मात्र अवघ्या ४० जागा मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांची समजूत काढण्यात त्यांना यशही आले. अशात आणखी दोन जागा कमी झाल्याने भाजपाने ३८ जागांवर उमेदवार दिले. श्री. केळकर यांनी यावेळी ज्येष्ठ नेत्यांचे सहकार्य घेत पक्षातील नवीन चेहऱ्यांना उमेदवारी दिली. यात …सौ. यादव, उषा वाघ, अनिता ठाकूर, माधुरी मेटांगे, वैभव कदम, सीताराम राणे, विकास पाटील आदींचा समावेश होता. त्यामुळे कार्यकर्त्यांमधील नाराजीची जागा उत्साहाने घेतल्याने प्रचारात आणि मतदानाच्या दिवशी त्यांचा सहभाग मोठा दिसून आला. शिवाय मतदारांमध्येही सकारात्मक वातावरण निर्माण झाले. अशात आमदार संजय केळकर यांनी देखील प्रचार काळात नियमितपणे व्यक्तिशः नागरिकांच्या भेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले, उमेदवारांच्या प्रचार रॅलीतून नागरिकांशी संवाद साधला. याचा परिणाम व्हायचा तोच झाला आणि भाजपचे ३८पैकी २८ उमेदवार निवडून आले. हा स्ट्राइक रेट ७४ टक्के होता. विशेष म्हणजे नव्याने निवडून आलेले नगरसेवक हे वागळे इस्टेट, वर्तकनगर ते घोडबंदरपासून दिवा-शिळ या भागातील होते. त्यामुळे भाजप दुपटीने वाढल्याचे या निवडणुकीतून दिसून आले. जागा जास्त मिळाल्या असत्या किंवा स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याचा निर्णय झाला असता तर महापौरही भाजपचा झाला असता एवढे नगरसेवक निवडून आले असते, असा विश्वास कार्यकर्ते आता बोलून दाखवत आहेत.
भाजपचे ठाणे निवडणूक प्रभारी आमदार निरंजन डावखरे यांनी देखील निवडणुकीत मोलाची भूमिका बजावली. उमेदवारांच्या प्रचारात हिरीरीने सहभाग घेतला. त्यांनी आमदार निधीतून केलेल्या कामांचाही फायदा झाल्याचे नागरिकांच्या संवादातून दिसून आले. शहर अध्यक्ष संदीप लेले यांनीही पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधला.एकूणच भाजपचे केवळ नगसेवकच वाढले नाहीत तर पक्षाला झालेले मतदानही लक्षणीय वाढले. याबाबत श्री. केळकर यांनी ठाणेकरांचे आभारही मानले.