
ठाणे : पर्यावरण अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार डॉ. प्रशांत सिनकर यांना पर्यावरण, जलसंवर्धन व सामाजिक विषयांवरील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत दोन राष्ट्रीय स्तरावरील मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. जयपूर येथील वुई केअर मीडिया फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘नॅशनल इन्स्पिरेशन अवॉर्ड २०२५’ तसेच बिहार राज्यातील एम. एच. फाऊंडेशनतर्फे प्रदान करण्यात येणारा ‘राष्ट्र सेवा पुरस्कार’ हा राष्ट्रीय पुरस्कार डॉ. सिनकर यांना सन्मानित करण्यात आला आहे.
डॉ. प्रशांत सिनकर हे गेल्या २६ वर्षांहून अधिक काळ पर्यावरण पत्रकारिता, जलसंवर्धन, निसर्ग संरक्षण, जैवविविधता तसेच सामाजिक प्रश्नांवर सातत्याने लेखन व जनजागृती करत आहेत. त्यांच्या प्रभावी लेखनामुळे अनेक पर्यावरणीय मुद्द्यांना राष्ट्रीय स्तरावर वाचा फुटली असून सामान्य नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत सकारात्मक बदल घडून आला आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी केलेले संशोधन, ग्रामीण व शहरी भागात राबवलेले जनजागृती उपक्रम तसेच माध्यमांच्या माध्यमातून सातत्याने केलेले सामाजिक कार्य याची दखल घेत या दोन्ही संस्थांनी डॉ. सिनकर यांची या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी निवड केली आहे. यापूर्वीही त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या दुहेरी राष्ट्रीय सन्मानामुळे ठाणे जिल्ह्याच्या पत्रकारिता व पर्यावरण चळवळीला नवी ऊर्जा मिळाली असून विविध स्तरांतून डॉ. प्रशांत सिनकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.