
- ज्येष्ठ पत्रकार प्रशांत रेखा रविंद्र सिनकर यांना ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार’ प्रदान
ठाणे : आरोग्य जनजागृती, सार्वजनिक आरोग्य विषयक अभ्यासपूर्ण लेखन आणि समाजाभिमुख प्रबोधन कार्यासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रशांत रेखा रविंद्र सिनकर यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार विधिवत प्रदान करण्यात आला. मुंबई येथे पार पडलेल्या दिमाखदार समारंभात हा पुरस्कार देऊन त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला. ठाणे जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरला.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित विशेष कार्यक्रमात राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, उपमहापौर संजय घाडी, आरोग्य सचिव ई. रविंद्रन आणि आरोग्य आयुक्त कादंबरी बलकवडे, संचालक नितीन अंबाडेकर आदींच्या हस्ते प्रशांत सिनकर यांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विविध क्षेत्रांतील मान्यवर, आरोग्य अधिकारी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला.
राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, पुणे यांच्या वतीने सन २०२४–२५ या वर्षासाठी राज्यस्तरीय निवड समितीने त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान केला. सार्वजनिक आरोग्य विषयक सातत्यपूर्ण लेखन, समाजात आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचे कार्य आणि शासनाच्या विविध आरोग्य उपक्रमांची प्रभावी मांडणी यासाठी त्यांची निवड करण्यात आली.
गेल्या २६ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय असलेल्या प्रशांत सिनकर यांनी आरोग्य, पर्यावरण, जलसंवर्धन, मानसिक आरोग्य, संसर्गजन्य आजार आणि सार्वजनिक आरोग्य धोरणे यांसारख्या विषयांवर सखोल व परिणामकारक लेखन केले आहे. संकटकाळात जबाबदार पत्रकारितेची भूमिका निभावत त्यांनी समाजाला योग्य माहिती, दिशा आणि प्रेरणा दिली.
समाजहिताला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या त्यांच्या पत्रकारितेची ही अधिकृत राज्यस्तरीय पावती मानली जात आहे. ठाणे जिल्ह्याच्या पत्रकारितेचा मान उंचावणारा हा सन्मान असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे