
भिवंडी तालुक्यात हत्तीरोग निर्मूलन मोहिमेचा शुभारंभ : जनजागृतीसाठी मोबाईल आरोग्य व्हॅनला हिरवा झेंडा
ठाणे – हत्तीरोग दुरीकरणासाठी महाराष्ट्र राज्य शासन वचनबद्ध असून त्या अनुषंगाने राज्यातील सहा जिल्ह्यांतील १६ तालुक्यांमध्ये दि. १० ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सार्वत्रिक औषधोपचार मोहीम (एम.डी.ए.) राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने भिवंडी तालुक्यात जनजागृतीसाठी मोबाईल आरोग्य जनजागृती व्हॅनचा वापर करण्यात येत आहे. या व्हॅनचे उद्घाटन व हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते करण्यात आला. ही मोहीम जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय, ठाणे व Godrej Embed – FHI संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोषी शिंदे, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती शिंदे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. बालाजी गावडे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी संजय जाधव, जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
या मोहिमेंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देऊन नागरिकांना हत्तीरोगविरोधी गोळ्या खाऊ घालणार आहेत. ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यामध्ये ही मोहीम जिल्हाधिकारी ठाणे डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून तांत्रिक नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोषी शिंदे यांच्या अधिपत्याखाली करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत एकूण ७ लाख १२ हजार ४९ पात्र लाभार्थ्यांना हत्तीरोगविरोधी औषधे देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभागी होऊन आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोषी शिंदे यांनी केले आहे.
ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने ही मोहीम प्रामुख्याने भिवंडी तालुक्यात राबविण्यात येत आहे. तालुक्यातील एकूण पात्र लोकसंख्या ५ लाख ८ हजार ७६५ इतकी असून स्थलांतरित पात्र लोकसंख्या २ लाख ३ हजार २८४ इतकी आहे. यामध्ये वीटभट्ट्या, गोदामे, नवीन बांधकामे, कारखाने आदी ठिकाणी कार्यरत व्यक्तींचा समावेश आहे. अशा पद्धतीने एकत्रित ७ लाख १२ हजार ४९ नागरिकांना औषधे देण्यात येणार आहेत.
हत्तीरोग हा सार्वजनिक आरोग्यासमोरील गंभीर प्रश्न असून संक्रमित डास चावल्यामुळे पसरणारा व दीर्घकालीन अपंगत्व निर्माण करणाऱ्या प्रमुख आजारांपैकी एक आहे. बहुतांश वेळा बालवयात संसर्ग होतो, मात्र त्याची लक्षणे प्रौढावस्थेत दिसून येतात. या आजारामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीचा महत्त्वाचा भाग असलेल्या लसिका संस्थेचे नुकसान होते व वेळीच प्रतिबंध न केल्यास शरीराच्या विविध भागांमध्ये असामान्य सूज निर्माण होऊ शकते. या आजारावर कायमस्वरूपी उपचार उपलब्ध नसून प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे.
मोहिमेदरम्यान भिवंडी तालुक्यात डीईसी व अल्बेंडाझोल या दोन औषधांची एकत्रित मात्रा दिली जाणार असून औषधे आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन दिली जातील. यासाठी ५३१ पथके तयार करण्यात आली आहेत. दोन वर्षांखालील मुले, गर्भवती महिला व गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना औषधे देण्यात येणार नाहीत. औषधे उपाशीपोटी घेऊ नयेत तसेच आशा सेविका किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच सेवन करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. ही औषधे आतड्यातील जंतुसंसर्ग व त्वचारोगांवरही प्रभावी असून मुलांच्या शारीरिक व बौद्धिक विकासास सहाय्यभूत ठरतात.